आघाडीवर काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करा : खंडाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST2021-04-22T04:40:59+5:302021-04-22T04:40:59+5:30
सातारा : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेची व प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रोत्साहन भत्त्याच्या नावाखाली चेष्टा सुरू केली ...

आघाडीवर काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करा : खंडाईत
सातारा : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेची व प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रोत्साहन भत्त्याच्या नावाखाली चेष्टा सुरू केली आहे. ती थांबवून या कर्मचाऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी काम करत असलेले नगरपालिका सफाई कामगार व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, मदतनीस यांना १२ महिन्यांच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता देताना परिपत्रकात शब्द छल केला आणि महिना १००० रुपये भत्ता न देता एकूण कामाचा १००० रुपये भत्ता दिला. म्हणजे प्रत्येक दिवसाला २.५० पै. इतका प्रोत्साहन भत्ता दिला आहे.
मागील वर्षी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात म्हणून फक्त तीनच महिने धान्य शिधापत्रिकेवर मोफत दिले आणि उरलेले नऊ महिने त्यांना वाऱ्यावर सोडले. यावेळीही राज्य सरकारने फक्त एक महिना तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू शिधापत्रिकेवर देण्याचे जाहीर केले. केंद्र व राज्य सरकारने सांगावे की, मागील वर्षी फक्त तीनच महिने आणि यावर्षी एकच महिना कोविड-१९ आहे. बाकीच्या वेळी नाही, त्यामुळे ही एकप्रकारे सर्वसामान्य जनतेची, त्यांच्या परिस्थितीची घोर चेष्टाच आहे. याचा विचार करून आता तरी कोविड-१९ ची गंभीर परिस्थिती आहे तोपर्यंत शिधापत्रिका असणारे, पण ज्यांना जगण्यासाठी धान्याची गरज आहे, त्यांना प्रती युनिट धान्य व डाळ, खाद्यतेल, साखर या वस्तू देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.