गीताचा मृत्यू; गुन्हा दाखल होणार

By Admin | Updated: May 12, 2015 23:44 IST2015-05-12T23:06:46+5:302015-05-12T23:44:34+5:30

ओझर्डे स्फोट : महिनाभराच्या झुंजीनंतर पूजाची सोडली अर्धावर साथ

Gita's death; To file a complaint | गीताचा मृत्यू; गुन्हा दाखल होणार

गीताचा मृत्यू; गुन्हा दाखल होणार

भुर्इंज : ओझर्डे स्फोटातील गंभीर जखमी गीता रामदास पवार (वय ७) हिची प्रकृती तीन दिवसांनंतर अचानक खालावली. त्यातच उपचारादरम्यान तिचा कण्हेरी, कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विक्रम भिकोबा आमले व त्याच्या साथीदारांवर ३०४ अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या झाल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, ओझर्डे यात्रेत ९ एप्रिलच्या मध्यरात्री दारूगोळ्याचा स्फोट होऊन गीता व तिची बहीण पूजा दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, सातारा व तरडगाव येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर या दोघी वाचणारच नाहीत, असे समजून त्यांना भुर्इंज येथे गोपाळवस्तीतील झोपडीत आणले. तेथे दोघी तडफडत होत्या. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दोघींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे काही दिवसांतच पूजाच्या प्रकृतीचा धोका टळला. तर काही दिवसांनंतर गीताच्या आतड्याची शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाल्याने गीताही वाचेल, असा विश्वास तेथील डॉक्टरांनी व्यक्त केला होता. झोपडीत वेदनेने तडफडणाऱ्या गीता व पूजाच्या वेदना थांबवण्यात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले होते. गीताची प्रकृती अधिक गंभीर असल्याने तिला मलमपट्टी करताना भूल दिली जात होती. एवढी काळजी तेथील डॉक्टर घेत होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून गीताची प्रकृती खालावत गेली. अखेर सोमवारी रात्री गीताची प्राणज्योत मालवली.
भुर्इंज येथे मंगळवारी सकाळी गीताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे, सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते. (वार्ताहर)

प्रकृती ढासळत गेली...
या दोघींना येथे उपचारासाठी दाखल केले, तेव्हाच त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती; मात्र पूजाच्या प्रकृतीचा धोका काही दिवसांतच टळला तर सुमारे २५ दिवसांच्या उपचारानंतर गीताही वाचेल, असा विश्वास होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून तिची प्रकृती अचानक ढासळत गेली आणि अखेर तिची प्राणज्योत मालवली. गीताचा मृत्यू आमच्यासाठीही वेदनादायी असून, पूजाची प्रकृती मात्र शंभर टक्केधोक्याबाहेर आहे.
- डॉ. अमोल मोहिते
गीता पवारच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी यात्रेमध्ये दारूगोळा उडविण्यास आलेला विक्रम आमले याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
-नारायणराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Gita's death; To file a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.