किल्ल्यावरून उडी मारून तरुणीने केली आत्महत्या
By Admin | Updated: May 9, 2017 01:12 IST2017-05-09T01:12:43+5:302017-05-09T01:12:43+5:30
किल्ल्यावरून उडी मारून तरुणीने केली आत्महत्या

किल्ल्यावरून उडी मारून तरुणीने केली आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणीने अजिंक्यतारा किल्ल्यावरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. सायली पवार (वय २५, रा. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सायली हिला रविवारी रागाच्या भरात अजिंक्यतारा किल्ल्यावरून जाताना अनेकांनी पाहिले होते. त्यामुळे रागाच्या भरातच तिने आत्महत्या केली असल्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून वर्तविली जात आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सायली पवार ही रविवारी सायंकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाइकांनी परिसरासह शहरात अनेक ठिकाणी शोध घेतला. तेव्हा सायली रागारागाने अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना पाहिले असल्याचे काहीनी तिच्या वडिलांना सांगितले होते. अजिंक्यतारा किल्ला परिसरात पाहणी केली असता ती किल्ल्याच्या कठड्याकडे गेली; पण परत आली नसल्याचेही अनेकांनी सांगितले.
यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिस व नागरिकांनी परिसर पिंजून काढला. मात्र, रात्री उशिरा अंधारात दरीत शोध घेणे शक्य नसल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.
त्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजता साताऱ्यातील सह्याद्री ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली. यामध्ये साताऱ्यातील कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या शोध मोहिमेत कैलास बागल, प्रतीक साळुंखे, अमीर नदाफ, प्रणव महामुने, अभिजित धुमाळ, सनी यवतकर, प्रज्वल बागल यांनी सहभाग घेतला. याची शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
ऐंशी फुटांवर मृतदेह
अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या सरळ सत्तर फूट कड्यावरून स्वत:ला झोकून देऊन सायलीने आत्महत्या केली. तेथून दहा फूट गरंगळत जाऊन मृतदेह पडला होता. ऐवढ्या खोल जाणे शक्य नसल्याने सह्याद्री ट्रेकर्सच्या स्वयंसेवकांनी पश्चिम दिशेला असलेल्या पाऊल वाटेने तेथेपर्यंत जाऊन मृतदेह पुन्हा त्याच दिशेने वर आणला.
स्पर्धा परीक्षेतून नैराश्य
सायली स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिने दोनवेळा परीक्षाही दिली होती. मात्र, त्यामध्ये अपयश येत होते. दोन गुणांनी तिची संधी हुकली होती. यामुळे ती तणावाखाली होती. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास तिने ‘मी किल्ल्यावर मंगळाईला जाऊन येते’ असे सांगितले. यावर ‘आईने तू एकटी जाऊ नकोस, कपडे धुऊन झाल्यावर दोघीही जाऊ,’ असे सांगितले. परंतु आई कपडे धुण्यास गेल्यानंतर ती घरातून निघून गेल्याचे तिच्या नातेवाइकांनी यावेळी सांगितले.
तरुणांनीही तिला रोखले
किल्ल्यावर सायंकाळी असंख्य तरुण फिरायला किंवा व्यायामाला येतात. ते व्यायाम करत असताना सायली एकटीच येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी काहीनी ‘तुम्ही एकटेच कोठे चालला आहात,’ अशी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी मंगळाई देवीच्या दर्शनाला आली असल्याचे तिने सांगितले. मात्र, ‘अंधार पडायला आला आहे. तुम्ही घरी जावा,’ असे काहीनी सांगूनही ती गडावर गेल्याचे काही तरुणांनी सांगितले.