प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊ गिरीश महाजन यांची ग्वाही :
By Admin | Updated: December 10, 2014 23:52 IST2014-12-10T22:32:36+5:302014-12-10T23:52:02+5:30
नागपूर विधानसभा अधिवेशनात चर्चा

प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊ गिरीश महाजन यांची ग्वाही :
पाटण : पाटण तालुक्यातील प्रलंबित प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नागपूर येथे विधानसभा अधिवेशनात आमदार शंभूराज देसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पाटण विधानसभा मतदार संघातील कोयना धरण प्रकल्पाअंतर्गत तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या अनेक मध्यम धरण प्रकल्पांची कामे ही प्रलंबित आहेत. काही प्रकल्प निधीअभावी अपूर्णावस्थेत आहेत. याअनुषंगाने आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात आली. आमदार देसाई यांनी वांग-मराठवाडी, तारळी, मोरणा गुरेघर, उत्तरमांड, निवकणे या मध्यम धरण प्रकल्पांच्या कामांच्या संदर्भात माहिती देताना प्रत्यक्ष पाहणी करून कामे पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच तारळी, मोरणा, गुरेघर या मध्यम धरण प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले कालव्याचे आणि उपसा जलसिंचन योजनांचे काम चुकीच्या मार्गाने सुरू असून या विभागातील शेतकऱ्यांना शंभर टक्के शेतीला पाणी मिळत नसल्याचे देसाई यांनी सांगितले. धरणातील पाणी धरणग्रस्तांना व शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळावे, यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची बाब आमदार देसाई यांनी मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. पाटण मतदार संघातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी विधानसभा अधिवेशनानंतर तातडीने प्रकल्पांची पाहणी करून कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. (प्रतिनिधी)