तब्बल ३५ वर्षांनी झाल्या भेटी
By Admin | Updated: January 1, 2015 00:15 IST2014-12-31T22:16:18+5:302015-01-01T00:15:33+5:30
वडूज : माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

तब्बल ३५ वर्षांनी झाल्या भेटी
वडूज : वडूज, ता. खटाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये १९७८ साली दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा उत्साहात पार पडला. १९७८ नंतर तब्बल ३५ वर्षांनी प्रथमच एकत्र भेटलेल्या माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
वडूज येथील यशवंत मध्यवर्ती मंगल कार्यालयात या स्रेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या शहरातील काही प्रतिष्ठितांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. १९७८ साली छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर यापैकी अनेकजण मुंबई, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, सांगली, नाशिक आदी ठिकाणी नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास गेले होते. त्यामध्ये महसूल विभाग, बँक, परिवहन अधिकारी, शिक्षण तसेच सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत अनेकांनी नावलौकिक कमविला होता. अशा सर्व जुन्या सवंगड्यांना या स्रेह मेळाव्यासाठी बोलविण्यात आले होते. असे सुमारे ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक व्ही. आर. गोडसे, एस. जे. गोेडसे, एल. जी. गोेडसे, ए. डी. शेख, एच. डी. शेख, जे.के. शिंदे, एस. एच. केंजळे, वसंत फडतरे, पोपट फडतरे यांचा विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी १९७८ साली दहावीत आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरील शिक्षण घेत असताना शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात यशस्वी झाल्याचे सांगितले.यावेळी सुरेश पवार, पांडुरंग काळे, अशोक राऊत, प्रताप राऊत, संभाजीराव खोडे, प्रताप गोेडसे, प्रताप काटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)