भुरट्यांच्या अंगात पुन्हा आलंय आमदारकीचं भूत

By Admin | Updated: August 12, 2014 23:14 IST2014-08-12T22:32:37+5:302014-08-12T23:14:31+5:30

शिवेंद्रसिंंहराजेंची टीका : सोनगावात विरोधकांची घेतली हजेरी

The ghost of the MLA came back in the limelight | भुरट्यांच्या अंगात पुन्हा आलंय आमदारकीचं भूत

भुरट्यांच्या अंगात पुन्हा आलंय आमदारकीचं भूत

सातारा : ‘हलगी वाजली की काही जणांच्या अंगात येते, तसे निवडणुका आल्या की काही जणांच्या अंगात आमदारकीचे भूत शिरते. मात्र, हा नरेंद्र दाभोलकरांचा जिल्हा आहे. आमदारकीचे हे भूत जनताच उतरवेल,’ अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी केली.
सोनगाव येथे सातारा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, किशोर ठोकळे, रवी साळुंखे, वनिता पोतेकर, पंचायत समितीचे सभापती धर्मराज घोरपडे, सदस्य सूर्यकांत पडवळ, सुदर्शना चव्हाण, माजी सभापती अरविंंद चव्हाण, अजिंंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप निंंबाळकर, मोहन साळुंखे, रामचंद्र चव्हाण, दिनकर पवार, दादासाहेब शेळके, मारुती कदम उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले, ‘आपण कुणालाही मदत मागायला गेलोच नाही, तर मदत हवीच कशाला,’ असा सवाल करून ते म्हणाले, ‘अशा भुरट्यांच्या पाया पडायला मी कदापि जाणार नाही. दिल्लीतून निधी आणण्यासाठी मला कोणा एजंटाची अथवा पीएची गरज नाही. लोकसभेची निवडणूक होऊन चार महिने झाले. त्यावेळच्या टोप्या आणि झाडू सगळं काही आता गायब झालंय. निवडणुकीपुरते हे लोक येतात आणि हाताला काही लागतंय का, डाळ शिजतेय का हे पाहतात. निवडणूक झाल्यानंतर यांना रस्त्यातील खड्डे, कोसळलेल्या दरडी अथवा लोकांचे प्रश्न का दिसत नाहीत,’ असा सवाल त्यांनी केला. बाबाराजे विचारमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. विक्रम पवार यांनी प्रास्ताविक केले. अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कमळ हाती घ्याल, तर चिखलात बुडाल!
‘कमळ हातात घेतलं की लोक आपल्या मागे येतील, असे काहीजणांना वाटत आहे. मात्र, कमळ आणायला गेला तर चिखलात बुडून मराल,’ असा इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला. मोदी लाट असूनही लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडूून आले आहेत. उदयनराजेंचे इंजेक्शन लगेच असर करते; पण मी दिलेल्या इंजेक्शनमुळे डायबिटिस होतो हे विरोधकांनी ध्यानात ठेवावे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिचुकले पाचवीलाच पुजलेला...
‘निवडणूक आली की काही लोक वाट्टेल ते आरोप करत सुटतात. जर आम्ही भ्रष्टाचार केला आहे तर पुरावे गोळा करा आणि आमच्यावर गुन्हा दाखल करा. माझ्या विरोधात कोणीही आणि कितीही उमेदवार उभे राहिले तरी मी घाबरत नाही. भाजप, सेना नाहीतर आमचा मित्र बिचुकले आहेच. तो तर आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे,’ अशी कोटी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Web Title: The ghost of the MLA came back in the limelight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.