महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखीन एक मनमोहक नजारा, सोळा वर्षांनंतर बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 12:29 PM2021-11-30T12:29:24+5:302021-11-30T12:34:28+5:30

महाबळेश्वर : कारवी वनस्पतीच्या अनेक प्रजाती पश्चिमघाटाच्या डोंगररांगात आढळून येतात. कारवीच्या सर्व प्रजाती या प्रदेशनिष्ट आणि अनोख्या सौंदर्याने जगभरात ...

The genus Strobilanthus scrobiculatus flourished in Mahabaleshwar after 16 years | महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखीन एक मनमोहक नजारा, सोळा वर्षांनंतर बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती !

महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखीन एक मनमोहक नजारा, सोळा वर्षांनंतर बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती !

googlenewsNext

महाबळेश्वर : कारवी वनस्पतीच्या अनेक प्रजाती पश्चिमघाटाच्या डोंगररांगात आढळून येतात. कारवीच्या सर्व प्रजाती या प्रदेशनिष्ट आणि अनोख्या सौंदर्याने जगभरात प्रसिद्धी आहेत. कारवीच्या काही प्रजातींना प्रत्येक तीन, ४, ६, ७ आणि १२ वर्षांनंतर फुलांचा बहर येण्याची अनोखी निसर्गसाखळी असते. या प्रजातींपैकी स्ट्रॉबीलँथस स्क्रॉबीक्यूलाटस ही प्रजात तब्बल सोळा वर्षांनंतर महाबळेश्वरात बहरली आहे. या वनस्पतीला मराठीमध्ये ‘सुपुष्पा’ किंवा ‘पिचकोडी’ असे म्हटले जाते. महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखीन एक सुवर्ण व मनमोहक नजारा / रूप आपणास पहावयास मिळत आहे.

अंदाजे एक आठवड्यापासून सुपुष्पाच्या फुलांच्या बहरास सुरुवात झालेली आहे. आणखी पंधरा दिवस सुपुष्पाच्या फुलांना बहर येत राहणार आहे. त्यानंतर त्याचे रुपांतर बियांमध्ये होईल. पुढे सोळा वर्षांपासून असणारी ही वनस्पती मरून जाते अथवा निष्क्रिय होते. त्याजागी बियांपासून नवीन वनस्पतीची निर्मिती होऊन त्याची वाढ होत राहते. ही नैसर्गिक प्रक्रिया होण्यासाठी सुपुष्पाच्या फुलांचे परागीभवन होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी निसर्गाने मधमाशी, फुलपाखरे व इतर कीटकांना परागीभवन करण्याची जवाबदारी दिलेली असते. हे सर्व घटक परागीभवन आपल्यापरीने करताना दिसत आहेत. परंतु याठिकाणी पर्यटकांची गर्दी व गोंगाट ऐकून मधमाशी, फुलपाखरे व कीटकांना परागीभवनासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वनपरिक्षेत्र महाबळेश्वर यत्च्याचेमार्फत सुपुष्पाच्या फुलांचे परागीभवन प्रक्रिया व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने वनस्पतींच्या ठिकाणी पर्यटकांचा अडथळा होऊ नये यासाठी दोन पर्यटनस्थळे दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे परागीभवनाची नैसर्गिक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.

वनविभागाचे कर्तव्य म्हणून सुपुष्पा वनस्पती त्याची बहर आलेली फुले आणि परागीभवन करणारे वन्यजीव, कीटक यांचे संरक्षण करण्यात येईल. तसेच जैवविविधता संवर्धनाचा भाग म्हणून ही मोहीम सातारा वनविभागाद्वारे राबविण्यात येत आहे. या सुपुष्पा वनस्पतीचे संरक्षण व संवर्धनाबाबत अहवाल तयार करून मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर वनवृत्त यांना सादर करण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक प्रा., डॉ. व्ही. क्लेमेंट बेन व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी मार्गदर्शन करीत आहेत सुपुष्पा वनस्पतीच्या फुलांचे परागीभवन तेथील मधमाशी, फुलपाखरू व इतर कीटकांमार्फत सुस्थितीत होण्यासाठी डॉ. योगेश फोंडे, मुख्य वनसंरक्षक प्रा. कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये महाबळेश्वर परिक्षेत्र वनअधिकारी श्रीकांत कुलकर्णी, वनरक्षक लहू राऊत, वनपाल सहदेव भिसे व संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती, महाबळेश्वर यांनी सहभाग घेतला.

Web Title: The genus Strobilanthus scrobiculatus flourished in Mahabaleshwar after 16 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.