सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून पाटण कोरोना केअर सेंटरला जनरेटर सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:38+5:302021-05-22T04:35:38+5:30
रामापूर : पाटण तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या आग्रही ...

सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून पाटण कोरोना केअर सेंटरला जनरेटर सुपूर्द
रामापूर : पाटण तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या आग्रही मागणीनुसार पाटण कोरोना केअर सेंटरला जनरेटर सुपूर्द करण्यात आला. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर हे स्वत: केअर सेंटरमध्ये क्रेनद्वारे जनरेटर उतरवून तो चालू करेपर्यंत तळ ठोकून उभे होते. जनरेटमुळे कोरोना केअर सेंटरमधील विजेची चिंता मिटली आहे. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, दिलीप मोटे, दिनकर घाडगे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, नगरसेवक किरण पवार उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विनंतीवरून गेल्या आठवड्यात पंचायत समितीच्या सभागृहात आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत आमदार शिंदे यांनी तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेताना लागेल ती मदत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व वैयक्तिक स्वरूपात करण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते.
या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ असल्याने याठिकाणी सातत्याने वीज जाण्याचे प्रकार घडत असतात. आता तर तोंडावर पावसाळा असून, वीजपुरवठा खंडित होण्याने बाधित रुग्णांसाठीच्या ऑक्सिजन पुरवठ्यात बाधा येऊन जीवावर बेतू नये. तसेच पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी येथे तातडीने जनरेटर मिळावा, अशी मागणी बैठकीतच आमदार शिंदे यांच्याकडे केली होती. आमदार शिंदे यांनी जनरेटर देण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते. त्यानुसार त्यांनी जनरेटर पाटण राष्ट्रवादी कार्यालयात पाठवला.
पावसाळा तोंडावर आल्याने वीज खंडित झाली तरी पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये विजेचा पुरवठा सुरळीतपणे होऊ शकतो. नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मागणीला आमदार शशिकांत शिंदे यांनी पाठबळ देत जनरेटर उपलब्ध करून दिल्याने पाटण विधानसभा मतदार संघातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो २१ रामापूर
पाटण कोरोना केअर सेंटरला जनरेटर प्रदान करण्यात आला. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, दिलीपराव मोटे, दिनकरराव घाडगे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, नगरसेवक किरण पवार उपस्थित होते. (छाया : प्रवीण जाधव)