गीता धोक्याबाहेर; आता पूजासाठी जोरदार प्रयत्न

By Admin | Updated: April 21, 2015 01:01 IST2015-04-21T00:44:35+5:302015-04-21T01:01:54+5:30

ओझर्डे स्फोट : ‘लोकमत’च्या पुढाकारानंतर दोन बहिणींवर कोल्हापूर येथे उपचार

Geeta out of danger; Now strongly try to worship | गीता धोक्याबाहेर; आता पूजासाठी जोरदार प्रयत्न

गीता धोक्याबाहेर; आता पूजासाठी जोरदार प्रयत्न


भुर्इंज : आर्थिक परिस्थितीअभावी उपचार करण्याची ऐपत नसल्याने ओझर्डे स्फोटातील ज्या पूजा व गीताच्या मृत्यूची वाट झोपडीत पाहिली जात होती, ते चित्र आता पालटले आहे. या दोघींतील गीता ही चिमुरडी आता पूर्णपणे धोक्याच्या बाहेर असून, ती शंभर टक्के वाचेल, अशी माहिती या दोघींवर उपचार करणारे कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलचे डॉ. अमोल मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, पूजा ही अद्यापही गंभीर असून, मात्र तीदेखील आता उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले.
ओझर्डे, ता. वाई येथे वार्षिक यात्रेतील स्फोटात भुर्इंज येथील गीता (वय ५) व पूजा रामदास पवार (९) या दोघी ६८ आणि ८० टक्के भाजल्या होत्या. अतिशय गरीब गोपाळ समाजातील पूजा व गीता यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालय, सातारा येथे दाखल केले होते. तेथे या दोघींना पुणे येथे नेण्यास सांगितले. मात्र, या दोघींचा सांभाळ करणाऱ्या आजीची ती परिस्थिती नव्हती म्हणून तरडगाव, ता. फलटण येथील नातेवाइकांनी या दोघींना तरडगावला नेले. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवायचे म्हणून ठवेले. मात्र, या दोघींना तेथूनही हलविण्यास सांगितल्यानंतर पुन्हा साताऱ्यात आणले गेले. सातारच्या शासकीय रुग्णालयाने पुन्हा पुण्याकडे बोट दाखवले. त्यामुळे अखेर कंटाळून या दोघींना भुर्इंज येथे पत्र्याच्या झोपडीत आणून ठेवले. या ठिकाणी दोघींच्या मृत्यूची जणू वाट पाहिली जात होती. चार दिवस अक्षरश: उष्णतेच्या झळा ओकणाऱ्या या झोपडीत पूजा व गीता पाणी-पाणी करत तडफडत होत्या. त्यांची ही कैफियत ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच त्याचदिवशी त्यांच्यावरील उपचार प्रक्रियेला सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, थायलंडमधील भारताचे राजदूत राजेश स्वामी, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर या शासकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन दाखवलेल्या तत्परतेमुळे पूजा व गीताला कोल्हापूर येथील सिद्धगिरी रुग्णालयात दाखल केले गेले.गीताची प्रकृती शंभर टक्के धोक्याच्या बाहेर आहे. पूजा देखील उपचाराला प्रतिसाद देत आहे. पूजानेही अशाच पद्धतीने उपचाराला प्रतिसाद दिला तर तीही वाचेल. (वार्ताहर)

डॉक्टरांचे कसोशीने प्रयत्न सुरू
ज्यांना अक्षरश: मरणाच्या दारात सोडले होते, त्या चिमुरड्यांना उपचाराचा आधार मिळून त्यांच्या जगण्याचे दरवाजे पुन्हा उघडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातील गीता आता शंभर टक्के वाचणार असून, पूजाही वाचावी यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू आहे. लक्ष घातले तर गोरगरिबांचेही जीव वाचू शकतात, ते एवढे स्वस्त नाहीत, हेच या घटनेतून सिद्ध झाले आहे.



गीता धोक्याच्या बाहेर आहे. मुळातच उपचाराला उशीर झाला; पण तरीही आम्ही प्रयत्नांची शर्थ करत आहोत. त्याला यश येऊन गीता वाचणार आहे. पूजाही आता उपचाराला प्रतिसाद देत आहेत. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्याने या दोघी आमच्यापर्यंत पोहोचल्या.
- डॉ. अमोल मोहिते

Web Title: Geeta out of danger; Now strongly try to worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.