सवलतीच्या दरात गॅस मिळेना; रासाटीत होणार ‘चुलीवरचे जेवण’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:38+5:302021-02-06T05:14:38+5:30
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गावांमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामपरिस्थितीकीय समिती स्थापन केल्यास त्या गावच्या विकासासाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधी गावाला देण्यात ...

सवलतीच्या दरात गॅस मिळेना; रासाटीत होणार ‘चुलीवरचे जेवण’ आंदोलन
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गावांमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामपरिस्थितीकीय समिती स्थापन केल्यास त्या गावच्या विकासासाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधी गावाला देण्यात येतो. रासाटी गावातही अशा प्रकारची ग्रामपरिस्थितीकीय समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या समितीमार्फत वनविभागाने अनेक आश्वासने देऊन ग्रामस्थांची फसवणूक केली असून, जाचक निर्बंध लादण्यात येत आहेत. या समितीच्या वतीने गावात सवलतीच्या दरात गॅस देण्यात आले होते. मात्र, अनेक महिन्यांपासून ही योजना बंद झाली असून, ग्रामपंचायतही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही योजना तत्काळ सुरू करून सवलतीच्या दरात गॅस देण्यात यावेत. अन्यथा रासाटी गावचे ग्रामदैवत असलेल्या नवलाई देवी यात्रेच्या दिवशीच २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या आवारात ‘चुलीवर जेवण’ करून आंदोलन करणार असल्याचे रासाटी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या आमिषा संजय कुंभार यांनी सांगितले.
वनविभाग व समितीच्या वतीने राबवित असणारी सवलतीच्या दरातील गॅस योजना गोरगरीब जनतेसाठी दिलासादायक होती. मात्र, कोरोना महामारीच्या कालावधीत निधीच्या कमतरतेचे कारण देत योजना बंद करण्यात आली. ग्रामपंचायतीस या विषयी कळवूनही लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायतीचाही वनविभागाच्या या षडयंत्रात हात आहे की काय ? असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही आमिषा कुंभार यांचे म्हणणे आहे.