गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर भस्मसात
By Admin | Updated: June 1, 2014 00:54 IST2014-06-01T00:54:23+5:302014-06-01T00:54:23+5:30
कोरेगावातील दुर्घटना : दुकानाला आग; १५ लाखांचे नुकसान

गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर भस्मसात
कोरेगाव : शहरातील जैन मंदिराशेजारी असलेल्या सचिन फर्निचर्स या दुकानाला शनिवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये दुकानातील फर्निचर, इतर साहित्य जळून खाक झाले. शेजारील सय्यद यांची इमारतही भक्षस्थानी पडली. घरातील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. प्रदीप नारायण बर्गे व महादेव बर्गे यांचे सचिन फर्निचर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री आठला दुकान बंद करुन दोघेही घरी गेले. पहाटे अडीचच्या सुमारास रात्रगस्त घालत असलेल्या पोलिसांना फर्निचरच्या दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात माहिती देत परिसरातील रहिवाशांना उठविले. तोपर्यंत दुकानास लागलेल्या आगीने गंभीर स्वरूप धारण केले होते. परिसरातील युवकांनी ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर मागवून घेतला. टँकरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी अपुरे पडले. त्यानंतर वीजपुरवठा खंडीत केला. तोपर्यंत आगीने शेजारील गणीभाई सय्यद, फिरोज गणीभाई सय्यद, बशीर मुसाभाई सय्यद, मुनीर मुसाभाई सय्यद, रफिक मुसाभाई सय्यद, शब्बीर महामूद सय्यद यांच्या दुकानवजा घराला लक्ष्य केले. सय्यद यांच्या घरातील तीन गॅस सिलिंडरपैकी एक सिलिंडर युवकांनी बाहेर काढला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच दोन सिलिंडरचे स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने युवकांची पांगापांग झाली. आगीचा जोर वाढल्यानंतर फिरोज यांच्या पानपट्टीला आग लागली. सय्यद यांचे दुकान, फॅब्रिकेशन वर्कशॉप, वरच्या मजल्यावरील कुंभार मोटार ड्रायव्हिंग स्कूल, मोबाईल शॉपी व टेलरिंग दुकानाला आगीने वेढले. लोडबेरिंगची फरशी खाली कोसळली. आनंद व नितीन बर्गे यांनी स्वत:चा ट्रॅक्टर आणून वखारातील कामगारांच्या मदतीने वायररोपच्या साह्याने सर्वच दुकानांची लोखंडी शटर्स ओढून काढली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास युवकांना शक्य झाले. सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणली. (प्रतिनिधी) पांगारेत चार तोळे सोने जळाले सातारा तालुक्यातील पांगारे येथील हरिदास गोविंद जाधव यांच्या घरालाही शुक्रवारी रात्री आग लागली. यामध्ये विमा पॉलिसीची कागदपत्रे, चार तोळे सोन्याची दागिने, कपडे, संसारोपयोगी वस्तू, धान्य, गवत आगीत भस्मसात झाले. यामध्ये सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.