गारेगार ‘चिल्लर’मध्ये; पण कष्ट ‘लाख’मोलाचं !
By Admin | Updated: April 15, 2016 23:27 IST2016-04-15T21:08:21+5:302016-04-15T23:27:55+5:30
शंभर रुपयांसाठी मैलोनमैल पायपीट : दुकानदारांकडून खरेदी केलेल्या कांड्या पोहोचतायत गावोगावी; कऱ्हाडात दीडशेहून अधिक विक्रेते

गारेगार ‘चिल्लर’मध्ये; पण कष्ट ‘लाख’मोलाचं !
कऱ्हाड : उन्हाळा वाढलाय. कधी नव्हे ते पारा चाळीस अंशांवर पोहोचलाय. या कडक उन्हात गारेगारची कांडी मिळावी, अशी प्रत्येकालाच अपेक्षा असते. गावोगावी फिरणारे विक्रेते सामान्यांची गारव्याची ही अपेक्षा पूर्णही करतात. पाच ते दहा रुपयांना ते गारेगार विकतात; पण चिल्लरमध्ये विकल्या जाणाऱ्या या गारेगारचं खरं ंंंअर्थकारण समोर आलंच तर ते थक्क करणारं असंच आहे.चार-दोन रुपयाला मिळणारी आईसकांडी तशी लाखमोलाची; पण ती खाणारा तीचं मोल फक्त पैशातंच मोजतो. या आईसकांडीची खरी किंमत विकणाऱ्याला समजते. कष्टाच्या स्वरूपात ती किंमत त्यालाच मोजावी लागते. कऱ्हाडात अशी काही कुटुंब आहेत की, जी फक्त हातगाडीवर आईसकांडी विकून मिळणाऱ्या पैशात गुजराण करतायत. अशा कुटुंबातील काहींच्या दोन पिढ्या याच व्यवसायात गेल्यात. मात्र, तरीही दुसऱ्याला थंडावा देण्यासाठी हा हातगाडीवाला दररोज किमान पंचवीस किलोमीटरची पायपीट करतोय. उन्हाचे चटके सोसतोय आणि कमावतोय फक्त शंभर ते दीडशे रुपये.
एखादी आईसकांडी विकत घेतल्यानंतर उत्सुकतेपोटी त्या विक्रेत्याच्या फायद्या-तोट्याचं गणित अनेकांनी मनोमन मांडलं असेल; पण आपण जे गणित करतो त्याहीपलीकडे या आईसकांडीच आणि त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच अर्थकारण चालतं. आईसकांडी ताब्यात घेतल्यापासून ते उरलेल्या कांड्या दुकानदाराला परत करेपर्यंत त्या विक्रेत्याला प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवावा लागतो. एक-एक रुपया आणि ज्यांनी हे भांडवल दिलं तो दुकानदार, या दोन्ही गोष्टी विक्रेत्यासाठी महत्त्वाच्या असतात. वास्तविक, गावोगावी जाऊन आईसकांडी विकणारे स्वत: या कांड्या तयार करीत नाहीत. एखाद्या दुकानदाराकडून त्या कांड्या संबंधित विक्रेता घेतो. आसपासच्या गावात जाऊन दिवसभर तो त्या खपवितो आणि मिळालेल्या पैशातून दुकानदाराला कांड्यांची खरेदी किंमत देऊन उरलेली कमाई खिशात घालून मार्गस्थ होतो.
कऱ्हाडच्या बुधवार पेठेतही विक्रेत्यांना आईसकांडी पुरविणारे काही दुकानदार आहेत. संबंधित दुकानदारांनी स्वत: हातगाडेही बनवून घेतलेत. ज्यांना कामधंदा नाही आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी अजिबात भांडवलही नाही, अशांना हे दुकानदार आपला हातगाडा देतात. त्याबरोबर दररोज सकाळी काही ठराविक आईसकांडीही देतात. दिवसभर त्या विक्रेत्याने ग्रामीण भागात आईसकांडी विकायची. सायंकाळी उरलेल्या कांड्यांसह गाडा दुकान मालकाच्या ताब्यात द्यायचा आणि आपली कमाई घेऊन घर गाठायचं, असा येथील दिनक्रम आहे.
‘आईसकांडीच्या पैशातून काही कुटुंब रोजीरोटी चालवितात. त्यांचा संसार चालतो, हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतोय. सध्या या व्यवसायात पूर्वीसारखी मजा नाही; पण उन्हाळ्यात या आईसकांडीमुळेच काही कुटुंबे स्वत:ची गुजराण करतात. आमच्याकडून आईसकांडी नेऊन गावोगावी त्याची विक्री करणाऱ्यांपैकी काहींच्या दोन पिढ्या यात गेल्यात. काहीजण निराधार आहेत तर काही अपंग; पण त्यांना
या व्यवसायानं खऱ्या अर्थानं
पाठबळ दिलंय,’ असे दुकानदार सांगतात. (प्रतिनिधी)
मिल्ककांडीला जास्त पसंती...
कऱ्हाडच्या बुधवार पेठेतील दुकानदार आईसकांडी व मिल्ककांडी या दोन प्रकारच्या कांड्या तयार करतात. त्यापैकी मिल्ककांडीला ग्राहकांकडून जास्त पसंती मिळते. आईसकांडीपेक्षा या कांडीची किंमतही थोडी जास्त असते. मात्र, विक्री जास्त होत असल्याने हातगाडीवाले आईसकांडीपेक्षा मिल्ककांडीच जास्त घेतात.
खरेदी-विक्रीचा हिशोब
आईसकांडीची विक्री करून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा सर्व हातगाडीवाले दुकानाच्या ठिकाणी येतात. दुकानातून ट्रे घेऊन उरलेल्या कांड्या त्यामध्ये भरतात. दुकानदाराला विक्री झालेल्या व शिल्लक कांड्यांचा हिशोब दिला जातो. ठराविक रक्कम दुकानदाराला देऊन विक्रेते आपल्या घराकडे निघून जातात.
सकाळीच होते व्यवसायाला सुरुवात
दररोज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्व विक्रेते दुकानाच्या ठिकाणी येतात. दुकानदाराकडून शंभर ते दीडशे आईसकांडी घेतात. त्या कांडी व बर्फ दुकानासमोर उभ्या असलेल्या हातगाड्यामध्ये भरतात आणि वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ होतात. एकाचवेळी पंचवीस ते तीस हातगाडे शहरातील बुधवार पेठेतून बाहेर पडतात.