बागबगीचे, पदपथाकडे लक्ष देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:37+5:302021-08-14T04:44:37+5:30
फलटण : ‘फलटणची वाढती लोकवस्ती विचारात घेऊन येथील रहिवाशांना पुरेशा नागरी सुविधा देताना प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यामुळे शहरात बागबगीचा, ...

बागबगीचे, पदपथाकडे लक्ष देण्याची गरज
फलटण : ‘फलटणची वाढती लोकवस्ती विचारात घेऊन येथील रहिवाशांना पुरेशा नागरी सुविधा देताना प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यामुळे शहरात बागबगीचा, लहान मुलांसाठी खेळणी, चालण्यासाठी बागेत पदपथ निर्माण करताना विलंब झाला तरी त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे’, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठ, शनी नगर येथील आरक्षण क्रमांक नऊमधील खुल्या जागेत बगीचा, ॲम्पी थिएटर, पदपथ वगैरे सुमारे ४३ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष नीताताई नेवसे, दादासाहेब चोरमले, नितीन भोसले, सलीम शेख, भाऊसाहेब कापसे, नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेविका वैशाली अहिवळे, वैशाली चोरमले, प्रगती कापसे, पप्पू शेख यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘फलटण शहरवासीयांच्या समस्या, अपेक्षा, गरजा नगराध्यक्ष झाल्यावर सुमारे तीस वर्षांपूर्वी जाणून घेतल्या. त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पुरेसा निधी नसल्याने मर्यादा येत होत्या. नगर परिषद जकात उत्पन्न ठेकेदारी पद्धतीने वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शासनाने जकात रद्द करुन त्या उत्पन्नाइतके अनुदान प्रतिवर्षी दहा टक्के वाढीने नगर परिषदांना देण्याची घोषणा केली. त्या ठेक्यामुळे जकात उत्पन्न वाढल्याचा फायदा झाला. नगर परिषदेचे उत्पन्न वाढले. त्याचा फायदा घेऊन अनेक नागरी सुविधांमध्ये सुधारणा केल्या. वाढत्या लोकवस्तीसह संपूर्ण शहराच्या नागरी सुविधा पुरेशा असल्या पाहिजेत, याला नेहमीच प्राधान्य दिले. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये उपलब्ध करुन घेऊन विविध योजना राबविल्या आहेत. शहरातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी सुमारे ८५ ते ९० कोटी रुपये झाले. ही योजना अंतिम टप्प्यात पूर्णत्वाकडे जात आहे, त्यातून उपलब्ध होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यातून नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल तथापि त्यापेक्षा शहरातील साथरोगांचे उच्चाटन करण्यास मोठी मदत होणार आहे.
फोटो
१३ फलटण
फलटण येथे विकासकामांचे भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर, नीताताई नेवसे उपस्थित होत्या.