घाटात कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:52+5:302021-05-22T04:35:52+5:30
मल्हारपेठ : उंब्रज ते मल्हारपेठ रस्त्यावरील उरुल घाटात दुर्गंधी वाढली आहे. मृत जनावरे व कचरा टाकण्याचे सत्र पुन्हा सुरू ...

घाटात कचरा
मल्हारपेठ : उंब्रज ते मल्हारपेठ रस्त्यावरील उरुल घाटात दुर्गंधी वाढली आहे. मृत जनावरे व कचरा टाकण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना अक्षरश: नाक धरून घाटाचा परिसर चालावा लागत आहे. या घाटात कायमच सुविधांची वानवा असते. त्यात नेहमीच समस्यांची भर पडत असून घाटातील एका वळणावर मृत जनावरे टाकली जात असल्याने त्याठिकाणी मोकाट श्वानांचा वावरही वाढला आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य
मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतर ही चर मुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्डाच प्रत्येकाचे स्वागत करत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत.
बेदरकार दुचाकीस्वार
मलकापूर : मलकापूर शहरात सध्या रात्रीच्यावेळी अनेक बेदरकार दुचाकीस्वारांकडून आपली दुचाकी भरधाव चालवली जात आहे. ढेबेवाडी फाटा, जिल्हा परिषद वसाहत रस्ता निर्जन असल्यामुळे त्यांचा वेग या मार्गावरील रस्त्यावरून प्रचंड असतो. लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना या दुचाकीस्वारांमुळे जिवास धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिबट्याची दहशत
कऱ्हाड : वसंतगड, ता़ कऱ्हाड परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे़ पश्चिम सुपने येथे काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन झाले होते. तसेच एक बिबट्या यापूर्वी मृतावस्थेत आढळून आला होता. मात्र, या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवारात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.