कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली येथील शेतकरी खाशाबा महादेव चव्हाण यांनी गंगूबाई या गाईचे डोहाळ जेवण थाटामाटात घातले. यावेळी गोडधोड पदार्थांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमास गावातील महिलांनी उपस्थिती लावली होती.शेतीपूरक व्यवसाय म्हणून चव्हाण यांनी देशी गाय पाळली असून, तिचे नाव ‘गंगूबाई’ ठेवले आहे. तिचे वय चार वर्षांचे आहे. तिला स्वत:च्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून सांभाळले जाते. चव्हाण कुटुंबीय दररोज या गाईची निगा राखतात. तिची स्वच्छता, चारा, पाणी याचीही देखभाल केली जाते. चौथ्या महिन्यातच या गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला. यावेळी तिच्या गळ्यात हार घालून तिचे औक्षण करण्यात आले. गावातील सर्व महिलांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले. गाईचे डोहाळ जेवण हा आगळावेगळा कार्यक्रम असल्याने महिलाही मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहिल्या. सर्व महिलांनी गाईचे औक्षण केले.चव्हाण कुटुंबीयांनी यावेळी गोडधोड पदार्थांचे जेवण बनविले होते. गाईला गोडधोड पदार्थ देण्यात आले. तसेच उपस्थित महिलांनाही लाडू, पापड, धपाट्या, चवळ्याची उसळ, वड्या आदी पदार्थांचे जेवण देण्यात आले. गंगूबाईच्या या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम परिसरामध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे. गाईचे अनोख्या पद्धतीने डोहाळ जेवण घातल्याबद्दल कौतुक होत आहे. (वार्ताहर)आमच्या तीन पिढ्यांपासून जनावरांच्या शेडमध्ये गाईचा राबता आहे. संस्कृतीचे दर्शन आणि धार्मिक वृत्ती म्हणून आम्ही त्यांची जोपासना करतो. इतर जनावरांच्या तुलनेत गाईची देखभाल आणि निगा राखण्यावर आमचा भर असतो.- खाशाबा चव्हाण, कोपर्डे हवेली
‘गंगू’गाईच्या डोहाळ जेवणाला अख्खं गाव नटून-थटून आलं!
By admin | Updated: March 18, 2016 23:57 IST