दरोडेखोरांची टोळी पिस्तुलासह जाळ्यात
By Admin | Updated: May 10, 2015 00:43 IST2015-05-10T00:39:40+5:302015-05-10T00:43:11+5:30
४६ काडतुसे सापडली : महामार्गावरील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याची दिली कबुली

दरोडेखोरांची टोळी पिस्तुलासह जाळ्यात
सातारा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून पिस्तूल, ४६ जिवंत काडतुसे आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यांचे वाहनही ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे दीड महिन्यापूर्वी महामार्गावर
झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.
पुण्याहून साताऱ्याकडे काही जण दरोड्याच्या उद्देशाने स्कॉर्पिओ जीपमधून येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्मााकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महामार्गावर नाकाबंदी केली होती. म्हसवे गावच्या हद्दीत महामार्गावर सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि कर्मचारी रस्त्याच्या दुतर्फा दोन पथके करून दबा धरून होते.
स्कॉर्पिओ जीप येताच ती थांबविण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी केला. परंतु जीप न थांबता चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. चालक पोलीस कॉन्स्टेबल मारुती अडागळे यांनी पोलिसांची सुमो जीप स्कॉर्पिओला आडवी मारून स्कॉर्पिओ थांबविली. गाडीतील तीन जण उतरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु झाडा-झुडपाचा आधार घेऊन ते पळून गेले. तथापि, स्कॉर्पिओ गाडीतील अन्य तिघांना पोलिसांनी पकडले.
अनिल रामचंद्र आढाव (वय ४३, रा. देहूरोड, पुणे), सुभाष नटराज पुजारी (वय ३४, रा. वेल्लूर, जि. त्रिनोली, तमिळनाडू) आणि अमित धीरूभाई पटेल (वय ३३, रा. कौपरखैरणे, बोनखाडेगाव, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांची झडती घेतली असता अनिल आढाव याच्या पँटमध्ये खोवलेले बिगरपरवाना पिस्तूल पोलिसांना सापडले. पिस्तुलाच्या मॅगझीनमध्ये सहा राउंड होते.
जीपमध्ये काळ्या रंगाची सॅक होती. त्यात पक्कड, स्क्रूड्रायव्हर, मिरची पावडरचा पुडा, चार मोबाइल असा मुद्देमाल सापडला. सॅकमधील रुमालात एक मॅगझीन आणि चाळीस जिवंत काडतुसे सापडली. या मुद्देमालाची किंमत ६ लाख ११ हजार रुपये इतकी आहे.
आपण दरोडा टाकण्यासाठी चाललो होतो, अशी कबुली या तिघांनी दिली. या तिघांसह सहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी करणे आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरीक्षक दत्तात्रय नाळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)