कऱ्हाड येथे सराईत दुचाकीचोर टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:03+5:302021-06-04T04:29:03+5:30
सातारा : सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला कऱ्हाड परिसरातून अटक केली. या टोळीने केलेल्या ...

कऱ्हाड येथे सराईत दुचाकीचोर टोळी गजाआड
सातारा : सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला कऱ्हाड परिसरातून अटक केली. या टोळीने केलेल्या दुचाकी चोरीचे १३ गुन्हे व शेणोली स्टेशन (ता. कऱ्हाड) येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न असे एकूण १४ गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
महादेव बाळासाहेब कोळी (वय ३०, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा), किशोर कृष्णा गुजर (२४, रा. कोडोली, ता. कऱ्हाड) व रोहित आनंदा देसाई (२३, रा. तांबवे, ता. कऱ्हाड) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून कराड शहर आणि कराड तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटारसायकलचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने कराड परिसरात खबऱ्यांकडून माहिती घेतली असता तिघा संशयितांनी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली दुचाकी व कराड परिसरातून अनेक मोटारसायकली चोरल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून पथकाने कराड परिसरामध्ये संशयित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्यांनी टेंभू, ता. कराड येथून दि. २९ रोजी एक मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून ७, कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीतून ३, तळबीड पोलीस स्टेशन हद्दीतील १, पलूस पोलीस स्टेशन जि. सांगली हद्दीतून १ तसेच कुरळप पोलीस स्टेशन जि. सांगली हद्दीतून १ अशा सातारा व सांगली जिल्ह्यातून एकूण १३ मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. तसेच दि. २७ मे २०२१ रोजी रात्री शेणोली, ता. कराड येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे ए.टी.एम. मशिन फोडले असल्याचे सांगितले. कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे करत असून, आरोपींकडून एकूण २ लाख २५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, संतोष पवार, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, रवी वाघमारे आदींनी केली.