घाडगेवाडी-बिबी परिसरात ट्रान्सफार्मर चोरांची टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:10+5:302021-08-20T04:45:10+5:30
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील बिबी-घाडगेवाडीत ट्रान्सफार्मर चोरांनी धुमाकूळ घातल्याने पाणी असूनही पिके सुकायला लागली आहेत. त्यामुळे ट्रान्सफार्मर ...

घाडगेवाडी-बिबी परिसरात ट्रान्सफार्मर चोरांची टोळी सक्रिय
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील बिबी-घाडगेवाडीत ट्रान्सफार्मर चोरांनी धुमाकूळ घातल्याने पाणी असूनही पिके सुकायला लागली आहेत. त्यामुळे ट्रान्सफार्मर चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात धोम-बलकवडीचे पाणी व गेल्यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाले. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा टिकून असल्याने शेतकऱ्यांनी बागायती पिके केली आहेत; परंतु जुलै महिन्यात ट्रान्सफार्मर चोरांनी धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत बिबी व घाडगेवाडी येथील तीन ट्रान्सफार्मर चोरीला गेल्याने पिके धोक्यात आली आहेत. याची दखल घेऊन वीज कंपनीने नवीन ट्रान्सफार्मर बसवले; परंतु गायकवाड वस्ती येथील दोन दिवसांत परत ट्रान्सफार्मर चोरीला गेला. गायकवाड वस्ती येथील ट्रान्सफार्मर निकामी झाला, तर पिसाळ ट्रान्सफार्मर सुस्थितीत आहे, पण तो बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी, कांदा, मका, ऊस, कडधान्य व भाजीपाला पिके पाणी असूनही विजेअभावी सुकू लागली आहेत,श तर कडधान्य हातची गेली आहेत. एकीकडे पावसाने पाठ फिरवलीश, तर दुसऱ्या बाजूला ट्रान्सफार्मर चोरांनी धुमाकूळ घातला आहे. वीज कंपनीने ट्रान्सफार्मर लवकर सुस्थितीत करावे, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
प्रतिक्रिया
घाडगेवाडी-बिबी परिसरात ट्रान्सफार्मर चोर सक्रिय झाले आहेत. वीज वितरणचे अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. त्यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. ट्रान्सफार्मर चोरांचा बंदोबस्त करावा व वीज वितरण कंपनीने ट्रान्सफार्मर सुस्थितीत करावेत.
- सुरेश सापते
घाडगेवाडी, ता. फलटण.
फोटो
फलटण तालुक्यातील घाडगेवाडी-बिबी परिसरात विद्युत ट्रान्सफार्मर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)