जमीन मोजणीची मशीन चोरणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: January 9, 2017 22:34 IST2017-01-09T22:34:09+5:302017-01-09T22:34:09+5:30

पाच युवक अटकेत : एक दिवसाची कोठडी, शिरवळ पोलिसांची कारवाई; कारसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

The gang ransacked the gang of land measuring machine | जमीन मोजणीची मशीन चोरणारी टोळी जेरबंद

जमीन मोजणीची मशीन चोरणारी टोळी जेरबंद

शिरवळ : जमीन मोजणी करण्याचा बहाणा करत जमीन मोजणी मशीनसह पोबारा करणाऱ्या व संबंधित मशीन आॅनलाईनद्वारे परराज्यात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरवळ पोलिसांनी पदार्फाश केला. याप्रकरणी पोलिसांनी ५ तरुणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह दोघेजण फरार आहेत. दरम्यान, संबंधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथील काळेवाडी परिसरामध्ये राहणारे नितीन माने (वय २२), राजकुमार माने (१९ ), मयूर आहेर (१९), सुमित इंगळे (२२, रा. बालेवाडी पुणे), हृषीकेश धहिवाळ (२१, रा. रहाटणी, काळेवाडी, पुणे) व मुख्य सूत्रधारासह दोघेजण खंडाळा तालुक्यात कार भाडेतत्त्वावर घेत होते. तसेच आधुनिक मशीनद्वारे खासगी जमीन मोजणी करून देणाऱ्या मशीन मालकांचे मोबाईल इंटरनेटद्वारे मिळवत त्यांच्याशी ते संपर्क साधत होते. जमीन मोजणी करून देणाऱ्या मालकाशी ते वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करत होते.
जमीन मोजणी करणाऱ्या व्यक्तीला पुण्यामधून भाडेतत्त्वावर घेतलेल्या कारमधून सोबत घेत. शिरवळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर ते नाष्टा किंवा जेवण करण्याचा बहाणा करत कारचालकासह हॉटेलमध्ये जात. यानंतर मोठ्या चतुराईने सर्वजण मशीन व कार घेऊन पोबारा करत असे. याप्रकरणी विशाल इतके, दत्तात्रय पोफळे, दाते व ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची व्याप्ती
लक्षात घेता शिरवळ पोलिस हे संबंधित टोळीच्या गेल्या काही महिन्यांपासून मागावर होते. शिरवळ पोलिसांनी फलटणचे पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने नितीन माने, राजकुमार माने,
मयूर आहेर सुमित इंगळे व
हृषीकेश धहिवाळ या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला मुदेमालासह जेरबंद केले.
पोलिसांनी या प्रकरणात एक कार जप्त केली असून, या प्रकरणात कार मालकाचा मुलगा हृषीकेश धहिवाळ याचाही समावेश आहे. पोलिसांनी कारसह एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, संबंधितांची न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने मंगळवार, दि. १० जानेवारीपर्यंत एक दिवसाची कोठडी सुनावली.
अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलिस हवालदार अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड हे करीत आहे. (प्रतिनिधी)
चोरटे उच्चशिक्षित
जमीन मोजणीची मशीन चोरून नेणाऱ्या टोळीमधील सर्वजण उच्चशिक्षित आहे. केवळ चैन व एशोआराम करण्यासाठी संबंधितांनी हे गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. संबंधितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शिरवळ पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The gang ransacked the gang of land measuring machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.