गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा : निलेश देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:05+5:302021-09-05T04:44:05+5:30
वडूज : तालुक्यातील सर्व गणेश मंडळे व कार्यकर्त्यांनी आगामी गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय ...

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा : निलेश देशमुख
वडूज : तालुक्यातील सर्व गणेश मंडळे व कार्यकर्त्यांनी आगामी गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी वडूज येथील आयोजित बैठकीत केले.
प्रशासकीय इमारत वडूज येथे वडूज पोलीस ठाणे हद्दीतील तसेच खटाव तालुक्यातील गणेश मंडळे, डीजे, स्पीकर मंडप व्यावसायिकांची उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार रविराज जाधव, मुख्याधिकारी खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत गणेश मंडळाचे पदाधिकारी, स्पीकर, मंडप व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून त्यांना सर्व गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेऊन पोलीस परवानगीकरिता ऑनलाईन अर्ज भरावा. शासनाच्या आदेशाप्रमाणे श्रीगणेशाची मूर्ती ही चार फुटांपेक्षा मोठी नसावी. घरगुती गणपती दोन फुटांचा असणे आवश्यक आहे. गणपती मंडपामध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. गणेशोत्सवामध्ये श्रीगणेशाचे आगमन व विसर्जनाला मिरवणुकीस परवानगी नाही.
डीजे, डाॅल्बी, बॅन्जोला परवानगी नाही. श्री गणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इ.द्वारे उपलब्ध करून गर्दी टाळावी. गणेश उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. त्याऐवजी आरोग्य विषयक शिबिर, रक्तदान शिबिर , स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबवावेत. गर्दी होईल असे गणेश उत्सव काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, अन्नदान, महाप्रसाद आदी कार्यक्रम परवानगी नाही आदी सूचना देण्यात आल्या.
०४वडूज
फोटो: वडूज पोलीस ठाणे अंतर्गत गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना डॉ. निलेश देशमुख, शेजारी मालोजीराव देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर व इतर.