विधानसभेच्या तोंडावर गणेश मंडळांची दिवाळी
By Admin | Updated: August 12, 2014 23:22 IST2014-08-12T21:52:10+5:302014-08-12T23:22:09+5:30
पाकिटाचे आकर्षण : आरतीसाठी मान्यवरांना आमंत्रण

विधानसभेच्या तोंडावर गणेश मंडळांची दिवाळी
वाठार स्टेशन : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उमेदवारांकडून गणेश मंडळांना पाकिटे वाटप झाल्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवातही गणेश मंडळाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या विधानसभा मतदार संघात चुरस आहे. त्या ठिकाणी पाकिटातील रक्कमही मोठीच राहणार असल्याने मंडळाची मात्र दिवाळीच साजरी होणार आहे.
निवडणुका समोर ठेवून मंडळातील युवकांना खुष करण्यासाठी गणेशोत्सवात सकाळी सायंकाळी मंडळांच्या आरतीसाठी गावातील प्रतिष्ठांनाबरोबरच नेते मंडळांनाही मंडळांकडून आमंत्रित केले जाते, हेच निमित्त साधून ही इच्छुक नेतेमंडळी या आरतीच्या ताटांमध्ये पैशाची पाकिटे टाकून मंडळांना खुष करण्याचा प्रयत्न करतात. मात्र निवडणुकांनंतरच्या चार वर्षात पाकिटाबरोबरच नेतेही गायब होतात.
चालू वर्षीच्या गणेशोत्सव हा विधानसभेच्या तोंडावरच येत असल्याने या गणशोत्सवात प्रामुख्याने जिल्ह्यात कोरेगाव-फलटण, कोरेगाव, माण-खटाव, पाटण अशा महत्त्वपूर्ण लक्षवेधी निवडणुका असणााऱ्या विधानसभेच्या मतदार संघातील लहान-मोठ्या मंडळांना वेगवेगळ्या प्रकारे हा नजराणा या नेतेमंडळींकडून मिळणार आहे.
पाच वर्षांतून एकदाच येणाऱ्या या गणेशोत्सवास विधानसभा गणेशोत्सव मंडळांना चालू वर्षांत मात्र चांगलीच दिवाळी या माध्यमातून साजरी करता येणार आहे.
मंडळांच्या वतीने केवळ आर्थिक मागणीबरोबरच मंडळ कार्यकर्त्यांसाठी टी-शर्टस्, ट्रॅकसूटस् तसेच ढोल-ताशा, डॉल्बी, साहित्यिकांचीही मागणी होत आहे.
त्यामुळे आगामी विधानसभेच्या निमित्ताने का होईना उमेदवारांकडून हा हट्ट पुरवला जाईल. अशीच अपेक्षा या आर्थिक वर्षांत मंडळाच्या कार्यकर्त्यांना होत आहे. (वार्ताहर)
पाच वर्षांपूर्वी कोरेगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या भांडवलांसाठी दोन हजार तर लहान मंडळांना एक हजारांचं पाकिट वाटलं. आता पुन्हा या निवडणुका गणेशोत्सव काळात येणार आहेत. त्यामुळे यावर्षी उमेदवार काय देणार ही उत्सुकता मंडळांना आहे.
- सुरज येवले, शेंदूरजणे, कोरेगाव