विषय डावलल्याने नगरसेविकेची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:29+5:302021-08-26T04:42:29+5:30
सातारा : स्थायी समितीच्या अजेंड्यावर घेण्यात आलेले वाॅर्ड क्रमांक १९ मधील चार विषय डावलण्यात आल्याने नगर विकास आघाडीच्या नगरसेविका ...

विषय डावलल्याने नगरसेविकेची गांधीगिरी
सातारा : स्थायी समितीच्या अजेंड्यावर घेण्यात आलेले वाॅर्ड क्रमांक १९ मधील चार विषय डावलण्यात आल्याने नगर विकास आघाडीच्या नगरसेविका लीना गोरे यांनी बुधवारी पालिकेत चक्क गांधीगिरी केली. गोरे यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांना गुलाबाचे फूल देऊन डावललेले विषय अजेंड्यावर घेण्यात यावे, अशी मागणी केली.
नगरसेविका लीना गोरे व त्यांचे पती सूर्यकांत गोरे यांनी बुधवारी दुपारी नगराध्यक्षांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, वाॅर्ड क्रमांक चारमध्ये सांस्कृतिक भवनाचे अद्ययावतीकरण, जंगीवाडा सांस्कृतिक भवन येथे बालकल्याण समितीकडून व्यायाम साहित्य पुरविणे, मंगळवार पेठ येथे पाणी हौदात कारंजे सुशोभीकरण, कारंज्यासाठी एलईडी दिवे व वायरिंग तसेच हौदाच्या भिंतीवर निसर्गचित्र काढणे ही कामे २६ जुलैच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी प्रस्तावित केली होती. मात्र ही सभा कोरमअभावी रद्द करण्यात आली.
दि. २७ ऑगस्ट रोजी स्थायी समितीची सभा होत असून, या सभेत ३१४ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र या सभेच्या अजेंड्यावरून ऐनवेळी आमचे चार विषय डावलण्यात आले. हे विषय येणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करावे किंवा मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या ८३ ब या अधिकाराखाली मंजूर करावे, अशी मागणी गोरे यांनी केली. या विषयांना न्याय न मिळाल्यास वॉर्डातील नागरिकांसह नगराध्यक्षांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.