दुर्मीळ जंगली सुरण वनौषधीमध्ये गणरायाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:48+5:302021-06-05T04:27:48+5:30

रामापूर : पाटण येथे जंगली सुरण तथा एलिफंट याम फूट ही दुर्मीळ वनौषधी आढळली आहे. विविध आजारांवर गुणकारी ...

Ganarayana's Darshan in the rare wild Suran herbal medicine | दुर्मीळ जंगली सुरण वनौषधीमध्ये गणरायाचे दर्शन

दुर्मीळ जंगली सुरण वनौषधीमध्ये गणरायाचे दर्शन

रामापूर : पाटण येथे जंगली सुरण तथा एलिफंट याम फूट ही दुर्मीळ वनौषधी आढळली आहे. विविध आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या या वनस्पतीचे फूल विविध आकारात फुलते. साधारणतः माशांप्रमाणे याचा आकार व रंग असतो. येथे फुललेल्या याच फुलाला गणपती मूर्तीसारखा आकार प्राप्त झाला आहे. भारतीय औषधात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक व पक्षी-प्राणी व वनस्पती अभ्यासक रोहन भाटे यांनी दिली.

या वनौषधीबाबत माहिती देताना रोहन भाटे म्हणाले, ‘ही औषधी वनस्पती असून, तिचे शास्त्रीय नाव ‘अमोरफ्लोफलास पाईओनीयफोलिस’ असे आहे. मराठीमध्ये त्याला ‘जंगली सुरण’ असे संबोधले जाते. याला इंग्रजीत ‘एलिफंट याम फूट’ असे म्हणतात. या वनस्पतीला साधारणतः मे ते जून महिन्यात फुल येते. या फुलाचा वास हा पहिल्या काही तासांत अतिशय घाण येत असल्यामुळे त्याच्या जवळ जाणे काहीसे कठीण बनते. ही वनस्पती केवळ प्राैढ असतानाच फुलते. दरवर्षी त्याला फुल येईलच असे नाही. हे फूल साधारणपणे पाच ते सहा दिवस टिकते. उष्णता निर्माण करणारी ही वनौषधी असून, त्याचा गंध, फुलांचे परागकण किड्यांना आकर्षित करतात. हे फूल सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेते. या फुलांची विविध आकारात निर्मिती होते. भारतात या जातीचे पीक मुख्यतः बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांत घेतले जाते. या वनौषधीचा वापर भारतीय औषधशास्त्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. आयुर्वेद, सिद्ध, युनानी या तिन्ही औषधी प्रणालींमध्ये याचा वापर केला जातो.

ब्राॅन्कायटीस, दमा, ओटीपोटात वेदना, उलट्या, जुलाब, प्लिहाचे विस्तार, मूळव्याध, हत्तीरोग, विकृत रक्तामुळे होणारे आणि संधिवात सूज यासाठी याचा वापर केला जातो. औषधीय अभ्यासामध्ये या वनौषधीचे विविध प्रकारचे प्रभाव दर्शविले गेले आहेत. या व्यतिरिक्त ॲन्टीबायोटिक्सचा वापर करताना बॅक्टेरियाची क्रिया कमी करण्यासाठीही ही वनस्पती सामर्थ्यवान असल्याचेही आढळले आहे. हत्ती रोगावर या वनस्पती कंदाचा फार गुणकारी व प्रभावी इलाज होत असल्यानेच याला इंग्रजीत ‘एलिफंट याम फूट’ नावाने ओळखले जाते, असेही रोहन भाटे यांनी सांगितले.

०४ रामापूर

पाटण येथील सुहासिनी पिसाळ यांच्या निवासस्थानी असलेले हे गणरायाच्या आकाराचे फूल सर्वांचे आकर्षण ठरत आहे. (छाया : प्रवीण जाधव)

Web Title: Ganarayana's Darshan in the rare wild Suran herbal medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.