डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:24+5:302021-03-25T04:37:24+5:30
ओढ्यावर अतिक्रमणे सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात केल्याने ...

डिस्टन्सिंगचा फज्जा
ओढ्यावर अतिक्रमणे
सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या परिसरातील रहदारी वाढल्याने आता पालिकेने अनधिकृत बांधकामे पाडून मुख्य रस्ते मोठे करण्याची गरज आहे.
पाण्याची टंचाई
खटाव : सतत भेडसावणार्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने १९७२ च्या दुष्काळात मांजरवाडी शिवारात ‘गव्हल’ आणि ‘पवारवस्ती’नजीक अशा दोन हजार तलावांची निर्मिती केली. मात्र, या तलावांना लागलेले गळतीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.
मोबाईल चोरटे सक्रिय
वाई : वाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यांचा शहरात सुळसुळाट झाला असून, सध्या भाजी मंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतूनच मोबाईलविना घरी परतावे लागत आहे.
वाहनचालक त्रस्त
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर आनेवाडी येथील टोलनाक्यावर फास्टट्रॅक असूनही वाहतुकीची कोंडी ही रोजचीच बाब बनली आहे. व्यवस्थापन मात्र याबाबत निष्काळजी दिसत असून वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. तरी फास्टट्रॅक यंत्रणा सुरळीत सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
घाटरस्ते धोकादायक
सातारा : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढली असून, अरुंद घाट रस्त्यांवर अधुन-मधून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार, सज्जनगड, यवतेश्वर, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी घाट मार्गातून जावे लागते.
प्राण्यांचा संचार वाढला
सातारा : लॉकडाऊनमध्ये बाहेर मानवाचा वावर कमी झाल्याने पशु-पक्षी व वन्यजीवांचा वावर वाढला होता. रस्त्यांवर वाहनांची संख्या रोडावल्याने पशु-पक्षी व वन्यजीव मुक्तसंचार करत होते. मात्र आता सर्व पूर्वीप्रमाणेच सुरू झाले आहे. त्यामुळे वारंवार नागरिकांची गर्दी वाढली असली तरी, वन्यजीवांचा मानवी वस्त्यांमध्ये संचार वाढलेलाच आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर, तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर बसविल्यास अपघात कमी होणार आहेत, तसेच अनेकांचे जीवही वाचणार आहेत.
कचरा वर्गीकरण नावालाच...
सातारा : पालिकेने सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करण्याचे आवाहन केले होते. त्या पद्धतीने घंटागाड्याही कचरा गोळा करत होत्या. मात्र, सध्या अनेक ठिकाणी घंटागाड्या हा कचरा एकत्रच गोळा करत असल्याने या कचऱ्याचे वर्गीकरणच होत नाही.
कचऱ्याचे साम्राज्य
सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातील लोटून काढलेला कचरा बाहेरून येणाऱ्या पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या फलाटाच्या कोपऱ्यात टाकण्यात येत आहे. त्यामुळे तो कचरा नियमित उचलला जात नसल्याने या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला आहे.
गॅरेजवर वाहनांची गर्दी
सातारा : उन्हाळा वाढू लागल्याने वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गाड्या गरम होऊन इंजिनही खराब होत असल्याने वाहने गॅरेजवर मोठ्या प्रमाणात न्यावी लागत आहेत. अनेक दिवस बंद असलेली वाहने देखील सुरू होत नसल्याने गॅरेजवर न्यावी लागताना पाहायला मिळत आहेत.
रोपे गेली वाळून
सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालये परिसरात बागा तयार केल्या आहेत. या बागेत विविध प्रकारची झाडे लावली आहेत. या झाडांना मुले घरून आणलेले पाणी घालत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे परिसरातील रोपे जळून चालली आहेत. या ठिकाणी पाणी घालण्यासाठी पर्यायी सोय करण्याची मागणी केली जात आहे.