वय विसरून सखी खेळल्या ‘फनी गेम्स’
By Admin | Updated: March 16, 2016 08:25 IST2016-03-16T08:25:14+5:302016-03-16T08:25:14+5:30
डबल धम्माका : संगतीला सुमधूर गीतांची मैफल; ‘शांताबाई...’ गाण्यांने आणली धम्माल

वय विसरून सखी खेळल्या ‘फनी गेम्स’
सातारा : खचाखच भरलेले शाहू कला मंदिर, हिंदी-मराठी जुन्या गाण्यांनी मन प्रसन्न झालेले अन् संगतीला मजेशीर खेळ. त्यामुळे सखींसाठी रविवारचा दिवस म्हणजे डबल धम्माकाच ठरला. अगदी वय विसरून अनेक सखी मजेशीर खेळात रमून गेल्या होत्या.
‘लोकमत सखी मंच’च्या वतीने सातारा येथील सखीमंच २०१६ च्या सभासदांना या वर्षातील पहिलाच ‘डबल धम्माल’ हा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सखीमंच कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व कलाकार उपस्थित होते.
चैताली माजगावकर-भंडारी यांनी मजेशीर खेळ घेतले होते. यामध्ये चहाचे थ्रमॉकॉलचे कप एकात एक ठेवत मनोरा लावणे. हे करत असताना समतोल सावरताना अनेकांना कठीण झाले होते. जिच्या मनाची एकाग्रता तीच ठरू शकते विजेती, हे या खेळाने दाखवून दिले. तोंड आणि हात, पायाला कागदाच्या पट्ट्यांनी बांधलं खरं; पण या खेळाने सखींची करमणूक करण्याबरोबरच विचार करायलाही लावला.
शिटी वाजवणे, सर्वात जास्त बांगड्या, फुगे घेऊन नृत्य, बसून फुगे फोडणे, पर्समध्ये मिस्टरांचा फोटो, एक हजारांची नोट, सगळ्यात सुंदर सही, खराब सही, पेज लाईक केल्यावर आॅनलाईन लकी ड्रॉ यासारख्या खेळांना विशेष पसंती मिळाली.
कार्यक्रमात खरी रंगत आणली ती मृदुला मोघे यांच्या सुमधूर गाण्यांनी. ‘पिंगा...’ या गाण्यांनी अनेक सखींनी व्यासपीठावर येऊन पिंगाचा फेर धरला.
‘शांताबाई...’ या गाण्यावर तर महिला मनसोक्त थिरकल्या. दरवेळी प्रमाणेच लावणी हाच आमचा विक पॉइंट असल्याचे सखींनी यंदाही दाखवून दिले. शिट्ट्या वाजवून लावण्यांना दाद दिली.
विनोदी शैलीतून सादर केलेले विनोदी किस्स्यांनी पोट धरून हसायला लावले. लहान मोठ्या खेळांमधून सखींनी बक्षिसांची लयलूट केली. (प्रतिनिधी)
सभासद होण्याची शेवटची संधी!
ज्या महिलांनी अजूनही सखीमंच सभासद नोंदणी केली नाही. त्यांच्यासाठी शेवटचे काही दिवस सभासद नोंदणी चालू आहे. सखींच्या आग्रहावरून रविवार, दि. २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मैत्रिणीस सभासद केल्यास त्यांनाही सरप्राईज गिफ्ट मिळवता येणार आहे. त्याच प्रमाणे सखींची सर्वाधिक पसंती मिळत असलेला ‘लावणी शो’ लवकरच आयोजित केला जाणार आहे.