जिल्हा नियोजनमधून कऱ्हाडसाठी निधी द्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:00+5:302021-02-05T09:14:00+5:30
कऱ्हाड : पालिकेला शहरासाठी जिल्हा नियोजनमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा, यासाठी लोकशाही आघाडीच्यावतीने सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री ...

जिल्हा नियोजनमधून कऱ्हाडसाठी निधी द्यावा!
कऱ्हाड : पालिकेला शहरासाठी जिल्हा नियोजनमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा, यासाठी लोकशाही आघाडीच्यावतीने सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. २०२०-२१ वर्षासाठी जिल्हा नियोजनमधून पालिकेला शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा. या निधीद्वारे शहरात भरीव कामे करता येतील. तसेच प्रलंबित राहिलेली कामेही करता येतील, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक मोहसीन अख्तर अंबेकरी, पल्लवी शिवाजी पवार, सुनंदा दिलीप शिंदे, माजी नगरसेवक सुहास पवार, जयंत बेडेकर, अमित शिंदे उपस्थित होते.
शिवपर्वत कॉलनीत स्वच्छतेची मागणी
मलकापूर : आगाशिवनगर येथील शिवपर्वत कॉलनीत स्वच्छता करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक आनंदराव चव्हाण यांच्यासह इतर नागरिकांनी पत्रकाद्वारे पालिकेकडे केली आहे. कॉलनीमध्ये सर्वत्र कचरा पसरला आहे. झाडी वाढली आहे. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच कॉलनीमध्ये एकही गटार नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. कॉलनीत स्वच्छता दररोज करावी, असे पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर नागरिकांच्या सह्या आहेत.
ट्रान्स्फॉर्मर बसविल्याने ग्रामस्थांची सोय
पाटण : कुसरुंड, ता. पाटण येथे नवीन विजेचा ट्रान्स्फॉर्मर बसविल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. ट्रान्स्फॉर्मरअभावी गावात कमी दाबाचा वीजपुरवठा होत होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. त्यानुसार गृहराज्यमंत्री देसाई यांनी या गावासाठी दुसऱ्यांदा ट्रान्स्फॉर्मर मंजूर करून ते काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची सोय झाली असून, खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
शामगाव घाटात फलकाची दुरवस्था
शामगाव : शामगाव घाट ते वाघेरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या सूचना फलकांची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्यावेळी वाहने चालविताना वाहनचालकांना दिशा समजत नसल्याने या मार्गावर छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या घाटमार्गाच्या पायथ्याला पोलीस चौकीही उभारण्यात आली होती. मात्र, सध्या त्याचा पोलिसांकडून वापर केला जात नसल्याचे दिसते. भुरटे चोर फलक उचकटून नेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर केवळ फलकांचे सांगाडे शिल्लक आहेत. बांधकाम विभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाडात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण
कऱ्हाड : येथील पालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नोडल ऑफिसर आर. डी. भालदार, करवसुली अधिकारी उमेश महाजन, आरोग्य, बांधकाम, गार्डन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पालिकेच्यावतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे काम सुरू आहे. कऱ्हाड शहर ग्रीन सिटी करण्याच्यादृष्टीने पालिकेने पाऊल उचलले आहे.
काले ते मसूर बस वेळेत सोडण्याची मागणी
कऱ्हाड : काले ते मसूर बस वेळेत येत नसल्यामुळे ग्रामस्थांना बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. सकाळी पावणेसात वाजता सुटणारी काले-मसूर बस सध्या आठ वाजता गावात येते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कऱ्हाडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कऱ्हाड आगाराने ही बस साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांतून केली जात आहे.