निधी खिशात.. तरीही ‘पाणी पाणी’ मुखात !

By Admin | Updated: April 6, 2016 00:28 IST2016-04-05T22:51:19+5:302016-04-06T00:28:03+5:30

पाटण तालुका : पंचायत समितीच्या सभेत सदस्य आक्रमक; विविध विषयांवर चर्चा--मासिक सभा

In the fund pocket .. still 'water water' mouth! | निधी खिशात.. तरीही ‘पाणी पाणी’ मुखात !

निधी खिशात.. तरीही ‘पाणी पाणी’ मुखात !

पाटण : सध्या पाटण तालुक्यात पाणी टंचाईची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना पाणीयोजना दुरुस्ती किंवा नव्या योजना उभ्या करण्यासाठी तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या खात्यावर सरासरी प्रत्येकी पाच लाखांपर्यंतच्या रकमा जमा झाल्या आहेत. अनेक महिने उलटून गेले तरी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांनी संबंधित गावांमध्ये पाणी योजनांची अंदाजपत्रके तयार न केल्यामुळे लाखो रुपये पडून असून, दुसरीकडे गावकरी पाणी-पाणी करत आहेत. याबाबत सदस्य विजय पवार व राजाभाऊ शेलार यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.
सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा झाली. सुरुवातीस शिक्षण विभागाचा आढावा न घेता प्राधान्याने तालुक्यातील पाणीटंचाईवर सविस्तर चर्चा करूया याबाबत सर्व सदस्यांचे एकमत झाले आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यास आढावा देण्यास सांगितले. त्यातच भरीस भर म्हणून पाणीपुरवठा उपअभियंता आर. व्ही. पाटील रजेवर असल्याचे सांगण्यात आले. यावर रामभाऊ लाहोटी यांनी नाराजी व्यक्त करून तालुक्यात अद्याप टँकर का सुरू झाले नाहीत. घोट, फडतरवाडी सारखी गावे पाण्यासाठी तडफडत आहेत अशी भावना व्यक्त केली.
ग्रामपंचायतींना पाणी योजनेसाठी व दुरुस्तीसाठी पैसे आलेत त्याचा विनियोग झाला असता तर पाणीटंचाईवर काही प्रमाणात
मात करता आली असती.
यावरून शाखा अभियंत्याकडून आढावा घेतला असता कुंभारगाव विभागात ३२ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींची अंदाजपत्रके तयार
तर पाटण २२ पैकी ६ चाफळ ४२
पैकी १९ असे सांगण्यात आले. त्यावरून संतापलेल्या सदस्यांनी
येत्या १५ तारखेच्या आत पाणी
योजना कामांची अंदाजपत्रके तयार करा, असे यावेळी बजविण्यात
आले. (प्रतिनिधी)


प्राथमिक शिक्षकांची मुले इंग्रजी माध्यमात
‘तालुक्यातील बऱ्याच प्राथमिक शिक्षकांची मुले इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शिकत आहेत,’ असा आरोप विजय पवार यांनी केला. ‘तर अशा शिक्षणाचा शोध घेऊन त्यांची पगारवाढ थांबवा,’ असे रामभाऊ लाहोटी म्हणाले. ‘प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही,’ असे मत राजेश पवार यांनी व्यक्त केले. ‘शिक्षकच जर स्वत:ची मुले इतर खासगी शाळेत शिकवत असतील तर प्राथमिक शिक्षकच कमी पडत असल्याचा संदेश बाहेर जातो, हे बरोबर नाही,’ असे राजाभाऊ शेलार म्हणाले.
कोयना धरणावर २० एप्रिल रोजी आंदोलन
‘स्थानिक जनतेच्या त्यागातून कोयना धरण उभे राहिले. अनेक गावांचे पुनर्वसन झाले. आज कोयना धरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची पाण्याची व विजेची तहान भागविली जाते. त्याच कोयनावासीयांना गेल्या दीड वर्षापासून नागरी सुविधांकरिता एक रुपयादेखील शासनाने दिलेला नाही. त्याविरोधात कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांच्या कार्यालयासमोर २० एप्रिल रोजी आंदोलन करणार,’ असे राजाभाऊ शेलार म्हणाले.

आमदारांच्या अभिनंदन ठरावानंतर काय झाले?
‘पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. वीजनिर्मिती होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेला शेतीपंपाच्या आलेल्या वीजबिलाची रक्कम माफ होणार, असा निर्णय आमदार शंभूराज देसार्इंनी करून घेतला. त्यांचे अभिनंदन केल्याचा ठराव गेल्या सहा महिन्यांपूर्वी मांडला. त्यानंतर आजपर्यंत वीजबिले माफ झाली नाहीत. कुठे आहे तुमचा जीआर,’ असा टोला सदस्य राजेश पवार यांनी लगावला.

Web Title: In the fund pocket .. still 'water water' mouth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.