फुल आहिस्ता फेको.. दोनो राजे देख रहे !, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे एकाच मंचावर
By सचिन जवळकोटे | Updated: June 18, 2018 01:11 IST2018-06-18T00:59:58+5:302018-06-18T01:11:28+5:30
गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढविणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे रविवारी रात्री एकाच मंचावर आले.

फुल आहिस्ता फेको.. दोनो राजे देख रहे !, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे एकाच मंचावर
सातारा : गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढविणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे रविवारी रात्री एकाच मंचावर आले. उपस्थितांना दोघांमधील अबोला स्पष्टपणे जाणवत होता. विशेष म्हणजे, या दोघांमध्ये त्यांचे काका शिवाजीराजे भोसले बसले होते.
सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता.
या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या शिवाजीराजे भोसले यांनी दोन्ही राजेंनाही कार्यक्रमाला बोलावले होते. काकांच्या शब्दाला मान देऊन दोन्ही राजे एकत्र आले, तेव्हा उपस्थितांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पसरले. कारण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राजेंमधील वाक् युद्ध वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपले आहे. 'शिवेंद्रराजे सो जा.. उदयनराजे आ जायेंगे,' असं म्हणणारे खासदार चक्क 'बिन दाढीचे प्रेम चोप्रा' ठरले होते. त्यामुळे एकमेकांना व्हिलन म्हणणारे हे दोन्ही राजे बॅडमिंटनच्या सोहळ्यात एकमेकांशी बोलणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
सुरुवातीला काकांनी उदयनराजेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मात्र त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे बिलकूल उठले नाहीत. जेव्हा काकांनी बाबाराजेंना पुष्पगुच्छ दिला, त्यावेळी उदयनराजेंनी पाठ करून आपल्या हातातील पुष्पगुच्छ ठेवण्यासाठी जागा शोधली. सोहळ्यातील पालकांनाही आपल्या मुलाच्या बक्षिसापेक्षा दोन्ही राजेंच्या हालचालीतच अधिक इंटरेस्ट होता. सोहळा संपल्यानंतर दोन्ही राजे निघून गेले. मात्र, बॅडमिंटनच्या कोर्टात शब्दांची चर्चा सुरू होती. जणू इथे 'शब्दांची फुले' झाली होती.