खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:13+5:302021-06-27T04:25:13+5:30
लोणंद : पाच कोटी रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना लोणंद पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. प्रवीण उर्फ ...

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक
लोणंद : पाच कोटी रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना लोणंद पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली.
प्रवीण उर्फ सोन्या नवनाथ गुरव (रा. तिरकवाडी, ता. फलटण) व विशाल दिनकर नरवाडे (रा. नऱ्हे, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ५ फेब्रुवारी रोजी डोंबाळवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत सूळवस्तीवरील कॅनॉलच्या पुलावरून अविनाश शामराव सोनवलकर (रा. डोंबाळवाडी, ता. फलटण) यांचे अपहरण करून पाच कोटींची खंडणी संबंधितांनी मागितली असल्याचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला होता.
गुन्हा नोंद झाला त्याचदिवशी लोणंद पोलिसांनी दुधेबावी (ता. फलटण) येथील फ्लॅटमधून अविनाश सोनवलकर यांची सुटका केली होती. मात्र, त्यावेळी अपहरण करणारे फरार झाले होते. तसेच बारामती शहर पोलीस ठाण्यातही या संबंधितांच्या विरोधात पाच कोटी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून संशयितांचा शोध लोणंद पोलीस घेत होते. या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार प्रवीण उर्फ सोन्या नवनाथ गुरव (राहणार तिरकवाडी, ता. फलटण) व बारामती पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील फरार विशाल दिनकर नरवाडे (रा. नऱ्हे, जि. पुणे) हे दोघेही तिरकवाडी (ता. फलटण) येथे असल्याची गोपनीय माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ कारवाई करीत पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्याने तिरकवाडी येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.