इंधन स्वस्त; रिक्षा भाडे जास्त
By Admin | Updated: December 2, 2014 00:26 IST2014-12-01T22:56:40+5:302014-12-02T00:26:18+5:30
चर्चेला उधाण : भाडेवाढ कमी होण्याची प्रतीक्षा

इंधन स्वस्त; रिक्षा भाडे जास्त
सातारा : ‘अच्छे दिन’ येणार, असे म्हणत सत्तेत आलेल्या भाजपाच्या सरकारने गेल्या काही दिवसांत सामान्यांना आधार देत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचा आनंद सामान्यांना अधिक झाला आहे. आता रिक्षा भाडेवाढही कमी होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल डिझेल दर आठ-दहा रुपयांनी कमी झाले आहेत. यापूर्वी जेव्हा कधी इंधनात वाढ झाली की रिक्षा संघटना भाडेवाढीसाठी सरसवायची. रिक्षाचालकांना ही वाढ देण्यासाठी प्रसंगी आंदोलनेही झाली. या गोष्टी लक्षात घेता आता इंधनाचे दर कमी झाल्यामुळे रिक्षा भाडे कमी होणार का? आणि किती रुपयांनी याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.
सातारा शहरातून शाहूपुरी, पोवई नाका, एस. टी. स्टॅण्ड येथे ‘शेअर रिक्षा’ आहेत. त्याबरोबरच नाक्यावरून संगमनगर, शिवराज पेट्रोल पंप, आकाशवाणी या परिसरात रिक्षा जातात. या शेअर रिक्षाचे दर बसच्या दराच्या दुप्पट आहेत. वेळेत बस मिळत नसल्यामुळे अनेक प्रवासी या रिक्षांतून प्रवास करतात. मधल्या काही काळात इंधन दरवाढीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ झाल्याचे चित्र दिसते. सध्या राजवाडा-शाहूपुरी दहा रुपये, राजवाडा-स्टॅण्ड दहा रुपये, राजवाडा-संगमनगर बारा रुपये, पोवई नाका- शिवराज पंप दहा रुपये, असे शेअर रिक्षाचे दर आहेत. (प्रतिनिधी)
रिक्षा केवळ इंधनावर चालत नाही. त्याला स्पेअर पार्ट आणि अन्य गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे इंधनाच्या किमतीत कपात झाली की भाडेवाढ कमी होणे शक्य नाही. रिक्षाचालकही सामान्य माणूस आहे. तोही परिस्थितीशी झगडत आयुष्य जगत आहे, याची जाणीव सर्वांनाच असावी.
- विष्णू जांभळे,
अध्यक्ष, अजिंक्य रिक्षा संघटना
वास्तविक रिक्षाचालकांनाही मोठ्या प्रमाणावर स्पर्धेला सामोरे जावे लागते आहे. घरोघरी वाढणाऱ्या दुचाकी-चारचाकी, यामुळे रिक्षा व्यावसायिकांचा धंदा मंदावला आहे. त्यातच वाहन परवाना, वाहन विमा यासह अनेक गोष्टींसाठी त्यांना खर्च असतो. सर्वत्र महागाईचा भस्मासूर वाढताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार के ला तर अन्य कोणताही व्यवसाय शक्य नाही म्हणून ते रिक्षा व्यवसायात उतरल्याचे लक्षात येते.