सुरक्षित मतदार संघासाठी मोर्चेबांधणी

By Admin | Updated: August 1, 2016 00:46 IST2016-08-01T00:46:17+5:302016-08-01T00:46:17+5:30

खंडाळा नगरपंचायत : शह-काटशहाच्या राजकारणाला उधाण; कॉँग्रेसच्या स्वतंत्र्य रणनीतीला राष्ट्रवादी देणार प्रत्युत्तर !

Frontline for safe constituency | सुरक्षित मतदार संघासाठी मोर्चेबांधणी

सुरक्षित मतदार संघासाठी मोर्चेबांधणी

दशरथ ननावरे ल्ल खंडाळा
खंडाळा नगरपंचायतीसाठी प्रमुख पक्ष आता सज्ज झाले असून, प्रभागवार उमेदवारांंचा शोध घेण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. विशेषत: तरुण कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस बळावत चालल्याने अनेकांनी सुरक्षित मतदार संघाचा आसरा घेण्यासाठी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. आपला प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागातील ही उठाठेव लोकांच्या नजरेत भरत आहे. त्यामुळे शह-काटशहाच्या राजकारणाला उधाण येणार, हे निश्चित झाले आहे.
खंडाळ्यातील पहिल्या नगरपंचायतसाठी १७ प्रभागांची रचना झाली. यामध्ये अनेक प्रमुख इच्छुकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. काहींचे प्रभाग आरक्षित झाले तर काही ठिकाणी महिलांसाठी राखीव झाल्याने येथील शेजारील मतदार संघात डाळ शिजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्या-त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासकीय पातळीवर पोहोचविण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. आजपर्यंत जनता ज्या समस्यांसाठी नेत्यांकडे पाठपुरवा करीत होती. त्याच समस्यांसाठी इच्छुक नेत्यांना कळवळा असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिक मात्र या चाललेल्या कसरतीकडे गमतीने पाहत आहेत.
खंडाळ्यात परंपरागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लढतीत प्रथमच शिवसेना आणि भाजपाने रस घेतला आहे. काँग्रेसच्या स्वतंत्र रणनीतीला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादीने चालविली आहे. त्यासाठी प्रभागावार तरुण कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन निवडणुकीच्या कामकाजाची तयारी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. तर काँग्रेसचे तरुण कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रभागवार पक्षाची मते रुजविण्याचा कित्ता गिरवला आहे.
शिवसेनेने पहिल्यापासूनच या निवडणुकीकडे स्वतंत्रपणे पाहिले असले तरी त्यांची ताकद सर्वच प्रभागात पोहोचणे जिकरीचे आहे. मात्र, भाजपाची अंतर्गत रणनीती प्रमुख पक्षांना डोकेदुखी ठरणार, हे मात्र नक्की आहे. त्यातच भाजपाच्या स्थानिक नेतृवाने आघाडीसाठीचे सर्व पर्याय खुले ठेवून कामकाज सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपाची ही साखरपेरणी कुठून कुठे सुरू आहे त्याचा उलगडा अद्यापतरी होत नसल्याने सर्वत्र चलबिचल आहे. खंडाळ्यात सुरू असलेल्या राजकीय हालचालीवरून या निवडणुकीकडे सर्व पक्षांनी बारकाव्याने लक्ष दिल्याचे दिसून येते. साहजिक राजकीय पटलावर धुरळा निश्चित उडणार आहे.
प्रभाग रचनांच्या सुनावणीवर लक्ष
खंडाळा नगरपंचायतीमधे प्रभाग २ व ३ यामध्ये स्थानिक क्षेत्राची सलगता राखण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही प्रभागांतील विकासकामांची मोठी अडचण होणार असल्याबाबतची हरकत भाजपाने घेतली आहे. तर विकास खंडागळे व शिवाजीराव खंडागळे यांनी आपल्या घरमिळकती १० मधून ११ मध्ये गेल्या आहे, तर प्रभाग १२ मध्ये स्पंदन हॉस्पिटल परिसर समाविष्ट केल्याबाबतच्या हरकती दाखल केल्या आहेत. या सर्व हरकतींवर दि. १ रोजी सुनावणी होत असून, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
प्रशासकीय कामकाजावर काँग्रेसचा हात
खंडाळा नगरपंचायत जाहीर झाल्याने सर्व कामगार प्रशासकाच्या हाती आला आहे. तरीही अगोदर काँग्रेसची सत्ता असल्याने त्यांच्या काळात मंजूर झालेल्या अनेक कामांवर काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. विशेषत: सध्या सुरू असलेल्या स्ट्रीटलाईटच्या कामातून लोकांच्या समोर जाण्याची संधी कॉँग्रेसने चांगलीच उचलून धरली आहे.
नोंदणीसाठी धावाधाव
नगरपंचायतीसाठी आपापल्या प्रभागातील मतदारांची नोंदणीसाठी धावपळ सुरू आहे. तर इतर गावांहून खंडाळ्यात वास्तव्यास आलेल्या अनेकांनी या ठिकाणी नावे नोंदवायला प्राधान्य दिले आहे. त्यातच निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मुदत ३१ आॅगस्ट पर्यंत वाढविल्याने सर्वांना धीर आला आहे.

Web Title: Frontline for safe constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.