आघाडीतल्या बिघाडीची उदयनराजेंकडून दुरुस्ती!

By Admin | Updated: July 16, 2014 01:22 IST2014-07-16T01:19:33+5:302014-07-16T01:22:30+5:30

उपनगराध्यक्षपद : शेख-गोडसे यांना प्रत्येकी साडेसात महिने संधी

Frontier eradication era rajagana repaired! | आघाडीतल्या बिघाडीची उदयनराजेंकडून दुरुस्ती!

आघाडीतल्या बिघाडीची उदयनराजेंकडून दुरुस्ती!

सातारा : सातारा विकास आघाडीत उपनगराध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु होती. ही धुसफूस कमी करुन आघाडीच्या बिघडलेल्या गाडीला दुरुस्त करण्याचे काम ‘साविआ’चे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे, त्यामुळे ही धुसफूस कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सातारच्या उपनगराध्यक्षपदासाठी दिनाज शेख यांच्यासोबतच दीपाली गोडसे याही इच्छुक होत्या. सातारा विकास आघाडीकडे नगराध्यक्षपद असताना या दोघींसह माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, नगरसेविका माधुरी भोसले, सुवर्णा पाटील यांच्यात या पदासाठी रस्सीखेच सुरु होती. अगदी शेवटच्या टप्प्यात सुजाता राजेमहाडिक यांना नगराध्यक्षपद दिले गेल्यानंतर दीपाली गोडसे व दिनाज शेख यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवरुन पुन्हा एकदा रस्सीखेच सुरु झाली होती. दिनाज शेख, दीपाली गोडसे यांच्यासोबतच विरोधी पक्षनेते अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, आघाडीतील सदस्यांचा अ‍ॅड. बाबरांना असलेल्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे पडले. आघाडीअंतर्गत दोन गट पडले. यापैकी एक गट दीपाली गोडसे यांच्यासाठी तर दुसरा गट दिनाज शेख यांच्या नावासाठी आग्रही होता. या दोघींचीही नाराजी लक्षात घेता आघाडीतील तणाव आणखी वाढू न देण्याचे धोरण उदयनराजेंनी आखल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. खासदार उदयनराजेंनी दिनाज शेख यांचे नाव जाहीर केले. मात्र, दीपाली गोडसे नाराज होऊन तिथून निघून गेल्या. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी उपनगराध्यक्षपदाची प्रत्येकी साडेसात महिने विभागणी करणार असल्याचे या बैठकीत जाहीर केल्याची माहिती आघाडीतील अधिकृत सूत्रांनी दिली.
दरम्यान, सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उपनगराध्यक्षपद देण्याचा शब्द उदयनराजेंनी दिला असल्याचे दीपाली गोडसे यांनी सांगीतले. तर पहिले साडेसात महिने दिनाज शेख पदावर राहतील. त्यानंतर पुढील वर्षी दीपाली गोडसे यांची निवड केली जाणार असल्याचे आघाडीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Frontier eradication era rajagana repaired!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.