संचालक, सभासदांचा सचिवाच्या घरावर मोर्चा
By Admin | Updated: August 4, 2014 00:09 IST2014-08-03T23:56:49+5:302014-08-04T00:09:41+5:30
संयम सुटला : देऊर विकास सेवा सोसायटी प्रकरण

संचालक, सभासदांचा सचिवाच्या घरावर मोर्चा
वाठार स्टेशन : ‘त्याचं नळकनेक्शन तोडा, त्याचा गोंधळ बंद करा, त्याच्या प्रॉपर्टीचा लिलाव करा आणि आमच्या नावावर काढलेली सोसायटीची कर्जे भरा,’ अशा घोषणा देत जवळपास २०० सभासद, आजी-माजी संचालकांनी सोसायटी सचिवाबाबत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर देऊर येथील सचिवाच्या घरावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला.
२००८ ते २०१३ पर्यंतचे देऊर, ता. कोरेगाव विकास सेवा सोसायटीची फेरतपासणी अंतिम निर्णयावर आली आहे. असे असतानाच सोसायटीत शनिवारी अचानक आजी-माजी संचालक मंडळ व सभासदांची बैठक झाली. या बैठकीत सचिवाची वडिलार्जित जमीन ताब्यात घेण्याबाबत सर्वानुमते निर्णय झाला. या निर्णयाची त्वरित अंमलबजाणवणी करण्यासाठी आज-माजी संचालक व सभासदांनी सचिवाच्या घराकडे मोर्चा वळविला. दरम्यान, सोसायटीत जवळपास २ कोटी ७५ लाखांची अफरातफर झाल्याचे प्रथदर्शनी दिसत आहे. अधिकृतरीत्या ते जाहीर होणार आहे. तत्पूर्वी सचिवाच्या वडिलार्जित स्थावर मिळकतीतून काही रक्कम भरता येईल का, यासाठी संपूर्ण गाव एकवटले आहे. (वार्ताहर)