ताजी भाजी कवडीमोल दरात!

By Admin | Updated: December 29, 2014 00:03 IST2014-12-28T22:05:18+5:302014-12-29T00:03:23+5:30

शेतकरी दुहेरी संकटात : ऊसदराचे भिजत घोंगडे; दूधदरही घटला; बँका, सोसायटीची कर्जे भागणार कशी?

Fresh vegetable is worthless! | ताजी भाजी कवडीमोल दरात!

ताजी भाजी कवडीमोल दरात!

कार्वे : शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नाही. ऊसदराचे घोंगडे भिजत आहे. दुधाचे दरही कमी झालेत आणि अशातच सध्या भाजीपाल्याचे दरही गडगडले आहेत. भाजीच्या पेंड्या कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. शेतकरी रस्त्यावर उभे राहून दोन-तीन रूपयात भाजीच्या पेंड्या विकत आहेत. सर्वच बाजुंनी संकटात सापडल्याने शेतकऱ्यांचे आर्थीक नियोजन कोलमडले आहे. शेती उत्पादनातून सोसायटी व बँकांची कर्जे सुध्दा भागणार नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागण्याची चिन्हे आहेत.
शेतीमध्ये सध्या व्यावसायीक दृष्टीकोन निर्माण झाला आहे. पारंपारीक शेती सोडून अनेकजण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच ठिबक, पट्टा पद्धतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. तरूण पिढीही शेतीकडे वळत असल्याचे दिसते. सध्याचे तरूण शिकले आहेत़ वेगवेगळ्या पदव्यही त्यांनी ग्रहण केल्या आहेत. मात्र, नोकरीसाठी सर्वत्र प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याने त्यांना वडीलोपार्जीत शेतीकडे वळावे लागत आहे़ कऱ्हाड तालुक्यात सर्वात जास्त बागायती क्षेत्र असल्याने येथील शेती फायद्याची समजली जाते. येथील शेतकरी ऊस, सोयाबीन, गहू, भात, पालेभाज्या आदी पिके घेतात. मात्र, सध्या यापैकी कोणत्याच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. त्यांना शेती उत्पादनाचा मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे़
सध्या सेना-भाजपा युतीचे सरकार आहे़ मंत्र्यांकडून अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिर्घकालीन उपाययोजना आखण्याची ग्वाही दिली जात आहे. मात्र, फक्त आश्वासने देण्यापेक्षा कृती करण्यावर शासनाने भर देणे गरजेचे आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा़ ऊसाला पहिली उचल किती द्यावी, याबाबत कारखान्यांशी चर्चा करून ऊसदर ठरवावा. मात्र, याबाबत कारखानदार व शासनाने अजुनही वाचा फोडली नाही़ तसेच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होऊन दीड महिना उलटला तरी ऊस बिलाचे घोंगडे अद्यापही भिजत आहे. ऊसदराला वाचा फोडण्याचे काम जिल्ह्यात अजुनही झालेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पहिली उचल जाहिर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे़ मात्र सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी दर जाहिर केला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच शेतीपुकर व्यवसाय म्हणून ज्याकडे शेतकरी पाहतात तो दुग्धोत्पादन व्यवसायही सध्या धोक्यात आला आहे. दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना दुग्धोत्पादन करणे जिकीरीचे बनले आहे.
हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांनी शेती खर्चासाठी सोसायटी व बँकांची कर्ज घेतली आहेत. मात्र, ऊसदर जाहिर न झाल्याने, उत्पादीत मालाला योग्य भाव नसल्याने व दुधाचे दरही कमी झाल्याने शेतकरी चांगलेच कात्रीत सापडले आहेत. यावर्षी शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)


मेथीच्या पेंड्या वीसला सहा !
शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेली भाजी सध्या कवडीमोल दराने विकली जात आहे. दोन दिवसांपुर्वी कऱ्हाडातील दत्त चौकात एका शेतकऱ्याने मेथीची भाजी विक्रिसाठी आणली होती. टेम्पोतून आणलेली पोती रस्त्यावर मांडून तो शेतकरी भाजी विकत होता. दहा रूपयाला तीन व वीस रूपयाला भाजीच्या सहा पेंड्या त्याच्याकडून विकल्या जात होत्या. एवढ्या कमी दरात भाजी मिळत असल्याने खरेदीदारांनीही भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती.

टोमॅटो दहा तर
वांगी पाचला किलो !
सध्या बाजारात सोयाबीन ३० रूपये, टॉमॅटो १० रूपये, वांगी ५ रूपये किलोने विकली जात आहेत. तसेच कोणत्यााही भाजीची पेंडी फक्त दोन रूपयांना विकली जात आहे. मेथी, कोथींबिर, फ्लॉवरलाही दर नाही. पावट्याची आवक झाली की भाजीचे दर कमी होतात.


ऊस, सोयाबिन व कापसाला सध्या योग्य दर मिळत नाही. शेती उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. नाहीतर शेतकरी कर्जबाजारी होणार, हे निश्चित.
- विश्वास थोरात, कार्वे

Web Title: Fresh vegetable is worthless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.