ग्रामपंचायतीच्या संदर्भातील तो आदेश फसवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:36+5:302021-04-01T04:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामस्थ हजेरी लावणार, अशी समाज माध्यमांवर पोस्ट फिरत आहे. मात्र, ती ...

ग्रामपंचायतीच्या संदर्भातील तो आदेश फसवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामस्थ हजेरी लावणार, अशी समाज माध्यमांवर पोस्ट फिरत आहे. मात्र, ती पूर्णतः चुकीची असून, याबाबतचा शासनाचा कोणताही आदेश वा परिपत्रक नसल्याचे जिल्हा परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मासिक सभेला गावातील लोकांना उपस्थित राहता येणार, अशी बातमी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वत्र फिरत आहे. अशी कोणतीही घोषणा सभागृहात झालेली नाही, कोणताही शासन निर्णय घेण्यात आला नाही, कसलीही याबाबत चर्चा झालेली नाही. फक्त पालघरमधील चिंचणी गावचा विषय होता. त्या विषयाला संबंधित अधिकारी यांनी राज्य शासन १५ सप्टेंबर १९७८ ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील ग्रामपंचायत सभा क्र. १७६ ।२। खंड ७ मधील नियम १ नुसार लोकांना सभेस उपस्थित राहणेबाबत कळवले आहे. परंतु त्यामध्ये मासिक सभा की, ग्रामसभा असे स्पष्ट नाही. हे परिपत्रक सर्वत्र फिरत आहे. हे परिपत्रक असेल तर ते फक्त संबंधित ग्रामपंचायतीला लागू असेल. कारण तो शासन निर्णय नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीशी याचा काडीमात्र संबंध नाही. याची सर्व गाव कारभाऱ्यांनी नोंद घ्यावी, ही माहिती पूर्णपणे सत्य असून, कोणीतरी विनाकारण गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्रने पाठपुरावा करून ही माहिती मिळवली आहे, अशी माहिती सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माऊली वायाळ, सचिव मंदाकिनी सावंत, मार्गदर्शक शंकरराव खापे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील एका तरूणाने ग्रामविकास विभागाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्याच्या पाठपुराव्यानंतर ग्रामस्थांना मासिक सभांना बसण्यास कोणी अडवू शकत नाही, असा आदेश दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या वृत्ताने ग्रामस्तरावरील यंत्रणा खडबडून जागी झाली. परंतु हा आदेश अद्याप जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ही फेक न्यूज आहे की काय, असा संशय सध्यातरी व्यक्त केला जात आहे.
कोट
ग्रामपंचायतीच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या परिपत्रकासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे शासकीय आदेश किंवा संदर्भात लेखी परिपत्रक मिळाले नाही. त्यामुळे प्रचलित नियमानुसारच ग्रामपंचायतीच्या मासिक सभा आणि ग्रामसभा होतील.
- अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
कोट
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेसंदर्भात दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर कोणीही विश्वास ठेवू नये. शासनाकडून याबाबत लेखी अध्यादेश प्राप्त झालेला नाही. पंचायत समित्यांनीही ग्रामपंचायतीला याबाबत कळवले नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष
सरपंच परिषद, पुणे, महाराष्ट्र राज्य
चौकट
ग्रामपंचायतीमध्ये चार ग्रामसभा घ्याव्या लागतात. गावकर भारत ग्रामसभेला विशेष महत्त्व आहे. ग्रामसभेला वेगळे अधिकारदेखील देण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या वृत्ताने जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासहित ग्रामस्थांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक ग्रामस्तरावरील यंत्रणा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नियमानुसार चालते. ग्रामपंचायतीमध्ये धर्माशी सभांना ग्रामस्थांनी उपस्थित राहण्यास परवानगी मिळाली तर मासिक सभा चालणार नाही, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी स्पष्ट करत आहेत.