सातारा : येथील संगमनगरमध्ये असलेल्या लघू पाटबंधारे विभागाची एका ठेकेदाराने फसवणूक केली. फसवणूकीची ही घटना समोर येताच संबंधित ठेकेदारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्रसिंह सोपानराव सूर्यवंशी (रा. आनवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.याबाबत लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुरेन हिरे यांनी फिर्याद दिली आहे. ठेकेदार सूर्यवंशी याने लघू पाटबंधारे कार्यालयाकडे सादर केलेल्या कामाच्या निविदेपोटी दिलेली आयसीआय बँकेची ७.२५ लक्ष गॅरंटी ही खोटी दिल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर कार्यालयातील मोजमाप पुस्तकांमध्ये खाडाखोड करून पाने बदलून नवीन पाने लावून शासकीय कार्यालयाची तसेच शासनाची फसवणूक केली.हा प्रकार निदर्शनास येताच लघू पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मछले हे अधिक तपास करीत आहेत.
कागदोपत्री हेराफेरी, ठेकेदाराकडून लघू पाटबंधारे विभागाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:35 IST