भिशीतून पावणेपंधरा लाखांची फसवणूक
By Admin | Updated: October 20, 2015 23:47 IST2015-10-20T21:22:37+5:302015-10-20T23:47:05+5:30
कुपवाडमधील घटना : दोघांना अटक; महिलांची पोलीस ठाण्यात गर्दी

भिशीतून पावणेपंधरा लाखांची फसवणूक
कुपवाड : येथील शरदनगरमधील जयश्री भिशी मंडळाच्या संचालकांनी शहर परिसरातील ५७ जणांची पावणेपंधरा लाखांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. भिशीच्या संचालिका मीना सुतारसह तिचा पती नंदकुमार कारंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शरदनगरमध्ये जयश्री भिशी मंडळाच्या नावाखाली संचालिका मीना सुतारसह दुसरे संचालक नंदू कारंडे हे भिशी व्यवसाय करतात. तक्रारदार महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार या गेल्या सात वर्षांपासून भिशी मंडळ चालवितात. या परिसरातील महिला व पुरुष नियमितपणे साप्ताहिक आणि मासिक हप्ते या भिशीमध्ये भरत होते. मागील भिशीचे वाटप नियमितपणे झाले; मात्र यावर्षी १५ आॅगस्टला फोडण्यात येणारी भिशी फोडली नाही. पैसे देण्यास संचालिका सुतार यांच्याकडून टाळाटाळ सुरू झाली. महिला व पुरुष सभासदांनी वारंवार पैशाची मागणी करूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यातील ५७ जणांना भिशीमध्ये आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी त्वरित कुपवाड पोलीस ठाण्यात संचालकांविरोधात लेखी तक्रार दिली.
त्यानंतर कुपवाडचे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संचालिका सुतार व पती कारंडे यांना अटक केली. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक केल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. (वार्ताहर)
सण तोंडावर : महिलांच्या डोळ्यांत पाणी
जयश्री भिशी मंडळाच्या संचालकांकडून फसवणूक झालेल्या बऱ्याच महिलांमध्ये एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या गोरगरीब कामगार महिलांचा समावेश आहे. त्यांनी पोटाला चिमटा देऊन काही पैसे भिशीमध्ये जमा केले होते; परंतु भिशी संचालकांनी पैसे परत देण्यास नकार दिल्यानंतर ऐन दिवाळीच्या तोंडावर अनेक गोरगरीब कामगार महिलांच्या डोळयात पाणी आले, तर अनेकांना रडू कोसळले.