भांबवली येथे मिनीबस खड्ड्यात कोसळली, चार पर्यटक जखमी
By हणमंत पाटील | Updated: May 27, 2025 22:01 IST2025-05-27T21:59:50+5:302025-05-27T22:01:13+5:30
चढावरून बस रिव्हर्स आल्याने अपघात

भांबवली येथे मिनीबस खड्ड्यात कोसळली, चार पर्यटक जखमी
सातारा : सातारा कास रस्त्यावर भांबवली येथे चढावर मिनीबस रिव्हर्स आल्याने वीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. यावेळी बसमध्ये चालकासह १४ जण होते. यातील चार जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. २७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला.
रोहन गोविंद मेटकरी (वय २२, रा. झरे, ता. आटपाडी, जि. सांगली), संग्राम संतोष देसाई (वय २०, रा. अडकूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर), अभिषेक चंद्रकांत चाैगुले (वय २१, रा. कोल्हापूर) यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा जखमींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून मिनीबसने १४ प्रवासी कास परिसरातील भांबवली येथील धबधबा पाहण्यासाठी आले होते. तेथे फिरून झाल्यानंतर सर्वजण मिनीबसने पुन्हा साताऱ्याकडे यायला निघाले. भांबवलीवरून कास रस्त्याला येताना चढावर मिनीबस रिव्हर्स आली.
गाडीचा ब्रेक न लागल्याने गाडी रस्ता सोडून थेट वीस फूट खड्ड्यात खाली कोसळली. बस अचानक खड्ड्यात कोसळल्यामुळे आतील प्रवासी गाडीतच फेकले जाऊन जखमी झाले. यामध्ये चार जणांना चेहऱ्याला व अंगावर किरकोळ जखमा झाल्या. अपघाताचा आवाज होताच भांबवली फाटा येथील ग्रामस्थ व दुकानदार आणि लगतच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने मदतकार्य सुरू करून प्रवाशांना तत्काळ वर आणले. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात मिळेल, त्या वाहनाने पाठविण्यात आले. यामध्ये कोणी खूप गंभीर नसल्याचे पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी सांगितले.