पंचवीस हजारात विकले चार तोळे
By Admin | Updated: December 11, 2014 23:52 IST2014-12-11T21:37:33+5:302014-12-11T23:52:07+5:30
काश्या काळेच्या लीला उघड : सराफाकडून सर्व दागिने हस्तगत

पंचवीस हजारात विकले चार तोळे
कऱ्हाड : तीन महिलांचा खून व एका महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न करून सिरीअल किलर काशिनाथ काळे याने चोरलेले तब्बल चार तोळ्याचे दागिने फक्त पंचवीस ते तीस हजारात सराफांना विकल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलीस पथकाने संबंधित सराफांकडून हे सर्व दागिने हस्तगत केले आहेत.
वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील यशोदा भोसले या महिलेच्या खुनप्रकरणी रविवार, दि. ७ रात्री काशिनाथ काळे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसुन तपास केला असता चोरीच्या उद्देशातून त्याने यशोदा भोसले यांचा खून केल्याचे उघडकीस आले. खून करून त्याने यशोदा भोसले यांची एक बोरमाळ, मंगळसुत्र व कर्णफुले आदी दागिणे चोरले होते. संबंधित दागिणेही काश्या काळे याने पोलिसांना दिले. वडोली निळेश्वरमधील या खुनप्रकरणाचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी इतर गुन्ह्यांबाबत त्याच्याकडे तपास सुरू केला. त्यावेळी अन्य दोन महिलांचा खून व एक खुनी हल्ला असे आणखी तीन गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले. तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार सज्जन जगताप यांनी याप्रकरणांचा कसुन तपास केला. २२ सप्टेबर २०१३ रोजी कऱ्हाडातील लिलाबाई पवार शेतात जात असताना काशिनाथ काळेने गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या कानातील दोन कुड्या व हजार रूपयांची रोकड असलेला बटवा घेऊन तो तेथुन पसार झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले. तसेच खटाव तालुक्यातील औंध व गणेशवाडी येथे २६ फेब्रुवारी २०१४ या एकाच दिवशी काशिनाथ काळेने दोन गुन्हे केल्याचे तपासातून उघड झाले. औंध येथे ‘काळी खुरी’ नावच्या शिवारात २६ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी एका महिलेला जखमी करून काशिनाथ काळेने तीच्याकडील सोन्याची माळ, कर्णफुले, बुगड्या, कुडके असे ७० हजार रूपये किमतीचे तीन तोळ्याचे दागिणे लंपास केले होते. तसेच त्याचदिवशी काळेने गणेशवाडी-औंध येथे ‘तरूळीचे माळ’ नावाच्या शिवारात भिमाबाई विठ्ठल जाधव (वय ५५) या वृद्धेचा खून केला होता.
संबंधित महिला जनावरे चारण्यासाठी गेली असताना काशिनाथ काळेने तीच्या डोक्यावर प्रहार करून तीचा खून केला. त्यानंतर दागिणे घेऊन तो तेथुन पसार झाला. संबंधित तीन्ही महिलांचा खून करून चोरलेले दागिणे काशिनाथ काळेने सराफांकडे विकले होते. ते सर्व दागिणे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. (प्रतिनिधी)
तीन तोळे फक्त वीस हजारात
खटावमधून हस्तगत केलेल्या दागिण्यांमध्ये दीड तोळ्याचे मंगळसुत्र, अर्ध्या तोळ्याची कर्णफुले, अर्ध्या तोळे वजनाच्या कुड्या, अर्ध्या तोळ्याच्या रिंग्ाां अशा तीन तोळ्याच्या दागिण्यांचा समावेश आहे. संबंधित दागिणे काशिनाथ काळेने फक्त वीस हजाराला विकले होते.
आरोपी काशिनाथ काळे याच्याकडून आत्तापर्यंत काही दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा सध्या तपास केला जात असुन नागरीकांना त्याबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- स्वप्नील लोखंडे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक