‘अजिंक्यतारा’च्या चार जागा बिनविरोध
By Admin | Updated: March 5, 2016 00:09 IST2016-03-04T21:59:34+5:302016-03-05T00:09:08+5:30
शिवेंद्रसिंहराजे, वेदांतिकाराजेंचाही अर्ज : २१ संचालक पदांसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल

‘अजिंक्यतारा’च्या चार जागा बिनविरोध
सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील २१ संचालक पदांसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. शनिवारी सकाळी ११ वाजता नियोजन भवनात दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली. संस्था ब गट, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती-जमाती या मतदारसंघांतील प्रत्येकी एक अशा चार जागा बिनविरोध झाल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट दिसत आहे.
संस्था ब गटामध्ये हरी साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा), अनुसूचित जाती-जमातीमधून अनंता वाघमारे (शेंद्रे, ता. सातारा) इतर मागासवर्गात यासिन इनामदार (पवाराची निगडी, ता. सातारा), भटक्या जाती व जमातीमधून सुरेश माने (टिटवेवाडी, ता. सातारा) यांचा एका जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला
आहे. त्यामुळे या चारही जागा बिनविरोध होण्यात जमा
आहेत.
ऊसउत्पादक मतदारसंघात सातारा गटातून प्रवीण शिंदे (पाटखळ, ता. सातारा), नामदेव सावंत (चिंचणी, ता. सातारा), आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), इंद्रजित नलवडे (वाढे, ता. सातारा), गणपत शिंदे (पाटखळ, ता. सातारा), नागठाणे गटात अशोक शेडगे (भरतगाव), माधव जाधव (निनाम पाडळी), प्रदीप पवार (मांडवे), संजय जाधव (अपशिंगे), किसन पवार (मांडवे). अतीत गटातून मनोहर घाडगे ( फत्यापूर), रामचंद्र जगदाळे (नांदगाव), राजाराम जाधव (काशीळ), प्रकाश जाधव (काशीळ) (२ अर्ज), प्रशांत पाटील (नांदगाव), दत्तात्रय घोरपडे (निसराळे).
चिंचणेर गटात सयाजीराव ताटे (तासगाव), विनायक बर्गे (चिंचणेर), विश्वास शेडगे (अंगापूर), सतीश चव्हाण (महागाव). गोवे गटातून अर्जुन साळुंखे (वनगळ), अशोक साबळे (शिवथर), सर्जेराव सावंत (लिंब), नितीन पाटील (मर्ढे), महेंद्र पवार (आरफळ), दिनकर पवार (लिंब), मोहन साळुंखे, राऊतवाडी (ता. वाई) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महिला राखीव गटात दोन जागांसाठी वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह विद्या शिंदे (सोनगाव सं. निंब) व अनुसया शिंदे (पाटखळ)
यांचे अर्ज दाखल झाले
आहेत.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला बिनविरोधची परंपरा आहे. या कारखान्याची सत्ता कायमच दिवंगत मंत्री अभयसिंहराजे भोसले यांना व त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाकडे राहिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी होईल.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)
कारखान्याकडून मागविली माहिती
सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सलग पाच वर्षांमध्ये सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकालाच निवडणुकीमध्ये ऊसउत्पादक गटातून अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे दाखल अर्जांपैकी किती जणांची गच्छंती होणार, हे शनिवारी स्पष्ट होईल. त्यासाठी कारखान्याला सलग तीन वर्षे किती सभासदांनी ऊस घातला. याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडून मागविला आहे.
दि. ३ एप्रिलला मतदान...
निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ८ ते २२ मार्च या कालावधीत अर्ज मागे घेता येणार आहे. निवडणुकीचे चिन्हवाटप २३ मार्च रोजी नियोजन भवनात होईल. निवडणूक लागल्यास ३ एप्रिल रोजी मतदान व ५ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.