जिल्ह्यात चार ठिकाणी बळीराजाचे स्वप्न खाक!
By Admin | Updated: March 20, 2016 00:20 IST2016-03-20T00:20:17+5:302016-03-20T00:20:17+5:30
दहा एकर ऊस आगीत खाक

जिल्ह्यात चार ठिकाणी बळीराजाचे स्वप्न खाक!
सातारा : जिल्ह्यात विविध चार ठिकाणी लागलेल्या आगीत बळीराजाचे स्वप्न खाक झाले. कऱ्हाड तालुक्यातील बानुगडेवाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून एक दोन म्हशी आणि एक रेडकू होरपळले. यातील एक म्हशीचा मृत्यू झाला, तर गोठ्याशेजारील घरालाही या आगीची झळ बसली. यामध्ये जीवनावश्यक साहित्य जळाले. खटाव तालुक्यातील काटेवाडी येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गहू, ऊस, आल्याचे पीक जळाले. यात सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. तर फलटण तालुक्यातील धुळदेव येथे ट्रॅक्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ऊस खाक झाला.
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथे ‘भवानी’ नावाच्या शिवारात शुक्रवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत दहा एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे शिवारातील उर्वरीत ऊस आगीपासून बचावला.
कोपर्डे हवेली येथे भवानी नावाचे शिवार असून शिवारात मोठ्या प्रमाणावर ऊसक्षेत्र आहे. सध्या या शिवारात ऊसतोडीही सुरू आहेत. काही ठिकाणी तोडणीचे काम सुरूच आहे. अशातच शुक्रवारी रात्री अचानक शिवारातील एका फडाला आग लागली. घटना निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ जमा होईपर्यंत आगीने शिवाराला वेढा दिला. एक एक फड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उसाचा पाचोळा वाळल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे ग्रामस्थांना शक्य झाले नाही. मात्र, उर्वरीत फडाला आग लागू नये, यासाठी ग्रामस्थांनी काही ठिकाणचा ऊस तोडून जागा केली. त्यामुळे आग थांबली.
आगीत विलास चव्हाण, शंकर चव्हाण, भाऊसाहेब तुपे, शशिकांत तुपे, अधिकराव चव्हाण, दिलीप चव्हाण, सुनील पिसाळ, तानाजी चव्हाण, पोपट चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. तसेच आगीमध्ये उसाच्या लागणीही होरपळल्या असून संबंधित शेतकऱ्यांचेही हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.