चार परप्रांतीयांना अटक

By Admin | Updated: November 11, 2014 00:00 IST2014-11-10T23:02:59+5:302014-11-11T00:00:47+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दरोड्याच्या तयारीत असताना पकडले; एक संशयित फरार

Four parasites arrested | चार परप्रांतीयांना अटक

चार परप्रांतीयांना अटक

सातारा : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार परप्रांतीयांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी दुपारी सातारा औद्योगिक वसाहतीत ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेले सर्वजण मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील कुच्ची तालुक्यातील आहेत. या टोळीतील एकजण पळून गेला आहे. दरम्यान, पकडण्यात आलेल्या या टोळीकडून महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बदनसिंग मिठ्ठू अलावा (वय ३०, रा. रामटिपराणी, ता. कुच्ची, जि. धार, मध्यप्रदेश), करमसिंग कालू भुरिया (वय २६, रा. गुराडिया), राजू शेकडिया (वय २७, रा. कालीदेवी), रमेश केशू अलावा (वय २०, रा. ग्राम पिपराणी) आणि सूर्या (पूर्ण नाव माहीत नाही) हे पाचजण सातारा शहर आणि परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती घेतली असता सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हे पाचजण सातारा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या साई पान शॉपसमोर दिसले.
येथे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून कटावणी, स्क्रू-ड्रायव्हर, चाकू, चटणीची पूड असा ९,३७० रुपयांचे साहित्य आढळून आले. यापैकी सूर्या पळून गेला असून, उर्वरित चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, हवालदार वाळू वायदंडे, विजय कांबळे, मोहन नाचण, संतोष जाधव, प्रवीण कडव, मारुती लाटणे, संजय वाघ आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


दरोड्याच्या तयारीत असणारी आणखी एक टोळी गजाआड
सातारा : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या आणखी एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री गजाआड केले. सातारा-कोरेगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करताना ही कारवाई सुरू असतानाच या टोळीतील दोघे पळून गेले. दरम्यान, या टोळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एन. जे. काळे, हवालदार पी. एच. घोरपडे, संजय पवार, कांतिलाल नवघणे, एस. आर. शिंदे, व्ही. एस. कांबळे, एम. बी. मुलाणी, एस. व्ही. बेबले, एन. एम. भोसले, वा. डी. पोळ, चालक संजय जाधव हे रविवार, दि. ९ रोजी रात्री दहा वाजता सातारा-कोरेगाव मार्गावर पेट्रोलिंग करत होते. याचवेळी ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर अनिल नारायण जाधव (वय २०, व्यवसाय जेसीबी चालक, रा. कळंत्रेवाडी, ता. कऱ्हाड, मूळ रा. अल्लापूर गंडा, विजापूर), कृष्णा विजय घाडगे (वय २१, व्यवसाय सेंट्रिग, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड), राहुल माणिक जाधव (वय २0, व्यवसाय सेंट्रिग, रा. चरेगाव, ता. कऱ्हाड) आणि विशाल जाधव (रा. लक्ष्मीनगर, उंब्रज, ता. कऱ्हाड), सोन्या (पूर्ण नाव माहिती नाही) हे उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यामुळे त्यांना हटकले असता त्यांच्याकडे मारुती व्हॅन त्याचबरोबर कुऱ्हाड, चाकू, भाला, हेक्सा ब्लेड, करवत अशी शस्त्रेही आढळून आली. याचवेळी विशाल जाधव आणि सोन्या हे दोघेही पळून गेले. चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four parasites arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.