शिंदेवाडी नळपाणी योजनेत चार लाखांचा गैरव्यवहार

By Admin | Updated: May 21, 2015 00:12 IST2015-05-19T23:00:34+5:302015-05-21T00:12:03+5:30

ग्रामसभेत खडाजंगी : टेंडरची कागदपत्रे गायब; ठेकेदारांची वादावादी

Four lakhs of fraud in Shindevwadi Nalpani scheme | शिंदेवाडी नळपाणी योजनेत चार लाखांचा गैरव्यवहार

शिंदेवाडी नळपाणी योजनेत चार लाखांचा गैरव्यवहार

पाटण : सन २०००-०८ मध्ये भारत निर्माण योजनेतून मंजूर झालेल्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतील निधीमध्ये तब्बल चार लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे ग्रामसभेत उघडकीस आले. या योजनेचे काम करणारे दोन ठेकेदार आणि त्यांच्यातील देण्या-घेण्याच्या वादातून फायनल बिलाचा चार लाखांचा धनादेश गावच्या पाणीपुरवठा समितीने कोणाला दिला? हेच समजले नाही. या योजनेच्या टेंडरची फाईल तत्कालीन ग्रामसेवकाने गायब केल्याचे सध्याच्या ग्रामसेवकाला तब्बल ५ वर्षांनी लक्षात आल्यामुळे भर ग्रामसभेत ग्रामसेवकने कपाटातील दप्तर उपसले; मात्र
फाईल सापडली नाही. या विषयावरून शिंदेवाडीच्या अनेक तरुण ग्रामस्थांनी ग्रामसेवक, ठेकेदार व पाणीपुरवठा अधिकाऱ्यास धारेवर धरले.
शिंदेवाडीची ग्रामसभा सरपंच राजाराम पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. नळपाणी योजनेच्या कामातील निधीमध्ये गैरव्यवहार असल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता आर. व्ही. पाटील हे उपस्थित होते. तत्कालीन सरपंच नंदा शिंदे आणि ग्रामसेवक यादव यांच्या कारकिर्दीत शिंदेवाडीची ३७ लाखांची नळ योजना मंजूर झाली. २००८ मध्ये शंभूराज देसाई यांनी भूमिपूजन करून कामास सुरुवात झाली. मात्र, गावच्या पाणीपुरवठा समितीने या कामासाठी बाबासाहेब देटके आणि विष्णू मोरे हे दोन ठेकेदार नेमले.
या दोघांनी नळ योजनेचे काम केले. मोरणा नदीवरून पाणी उचलून ते गावापर्यंत न्यायचे, अशी योजना होती. मात्र, या कामाचा शेवटचा चार लाखांचा धनादेश ग्रामपंचायतीने कोणाला दिला, ती रक्कम मला मिळालेली नाही. याबाबत पोट ठेकेदार देटके यांनी तगादा लावला. देटके यांनी तत्कालीन पाणीपुरवठा उपअभियंता एस. ए. बारटक्के यांच्यावर आरोप करत ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा करण्याचा इशारा ग्रामसभेत दिला.
मात्र, टेंडरची फाईल व त्यामधील दिलेले धनादेश गायब असल्यामुळे याबाबत काही सांगता येत नसल्याचे उत्तर ग्रामसेवक यांनी दिले. विहीर खुदाई, वितरणव्यवस्था व पाणी साठवण टाकी उभी करूनसुद्धा हे
सर्व काम निकृष्ट झाल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांनी ग्रामसभेत
केला. (प्रतिनिधी)


कार्यालयात या...
आयोजित केलेली ग्रामसभा ठेकेदारांच्या भल्यासाठीच होती. यामध्ये शिंदेवाडीच्या ग्रामस्थांना काही देणे-घेणे नसल्याचे दिसून आले. अखेर ठेकेदार विष्णू मोरे यांना त्यांच्याकडील टेंडरची फाईल बाहेर काढली. आणि उपअभियंता आर. व्ही. पाटील यांच्याकडे दिली. शेवटी आर. व्ही. पाटील यांनी दोन ठेकेदार मोरे आणि पेटके जवळ बोलावून कानमंत्र दिला. आणि नंतर ‘आॅफिसमध्ये या,’ असा सल्ला दिला. आणि ग्रामसभा संपली.

Web Title: Four lakhs of fraud in Shindevwadi Nalpani scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.