चार लाख रुपये खर्चाला मान्यता
By Admin | Updated: November 16, 2014 00:04 IST2014-11-16T00:04:14+5:302014-11-16T00:04:14+5:30
फलटण पालिका : सर्वसाधारण सभेत श्रीराम रथोत्सवासाठी खास तरतूद

चार लाख रुपये खर्चाला मान्यता
फलटण : फलटण पालिकेच्या सभेत आज (शनिवारी) शहरातील विविध विकासकामांच्या सुमारे १० ते १२ कोटींच्या निविदा तसेच श्रीराम रथोत्सवातील यात्रा व्यवस्था, कुस्ती आखाडा, स्वागत कमान, मल्लांचे मानधन यासाठी चार लाख रुपये खर्चास मान्यता आणि शहरात छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणीसाठी जागा व फलटण एज्युकेशन सोसायटीस दोन वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्यास एकमताने मान्यता देण्यात आली.
दरम्यान, बांधकाम समिती सभापती सुरेश ऊर्फ नंदू पवार यांनी ही सभा नियमबाह्य असल्याने रद्द करून पुन्हा बोलवावी, तसेच शहरातील विविध विकासकामांच्या निविदा मंजूर करताना त्याचा तपशील विषय पत्रिकेत देण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र सभेचे कामकाज पुढे सुरू राहिल्याने त्यांनी सभात्याग केला.
श्रीराम रथ यात्रेतील कुस्तीचा आखाडा भरविण्यासाठी आवश्यक तांबडी माती खरेदी त्याचप्रमाणे हार, नारळ, फेटा, हलगी, तुतारी, पोस्टर्स यासाठी ४५ हजार रुपये आणि तांबडी माती खरेदीसाठी ४० हजार त्याचप्रमाणे आखाड्यातील मल्लांच्या मानधनासाठी २ लाख ७५ हजार रुपये अशा एकूण चार लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
रथयात्रेतील कुस्ती स्पर्धेसाठी सोमाशेठ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. त्यामध्ये उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नंदकुमार भोईटे, सुरेश पवार, पै. हेमंत निंबाळकर, नितीन ऊर्फ भैय्या भोसले, किशोर पवार, फिरोज आतार, सनी अहिवळे, जालिंदर जाधव, अनिल जाधव, अनुप शहा यांची समिती नियुक्त करण्यास या सभेत एकमताने मान्यता देण्यात आली.
शहरातील विविध विकासकामांसाठी मागविलेल्या सुमारे १० ते १२ कोटी खर्चाच्या निविदा तुलनात्मक दराचा अभ्यास करून मंजूर करण्यात आल्या. छत्रपती संभाजी महाराज पुतळा समितीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन समोरील खुली जागा पुतळा उभारण्यासाठी मागणी केली आहे. त्यानुसार ४० बाय १७ मीटर आकाराची जागा समितीस देण्यास या सभेत मान्यता देण्यात आली.
पुतळा उभारण्याकामी शासन मान्यता, पुतळ्याचे क्ले मॉडेल, चबुतरा बांधणे, सुशोभीकरण यासाठीचा संपूर्ण खर्च पुतळा समितीने करावयाचा असल्याचे या सभेत स्पष्ट करण्यात आले. सभेत उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी क्रिकेट स्पर्धेत फलटण नगर पालिका संघ विजयी झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला तो एकमताने संमत करण्यात आला. (वार्ताहर)