चारशे वर्षांपूर्वीचे मंदिर दुर्लक्षित
By Admin | Updated: February 4, 2015 23:53 IST2015-02-04T22:41:51+5:302015-02-04T23:53:53+5:30
कार्वेचे धानाई देवी : रस्ता रूंदीकरणासह निवासस्थान होणे गरजेचे, सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

चारशे वर्षांपूर्वीचे मंदिर दुर्लक्षित
युवराज मोहिते - कार्वे येथील ग्रामादैवत व पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकचे श्रद्धास्थान असणाऱ्या चारशे वर्षांपूर्वीच्या धानाईदेवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. सोयी-सुविधा मिळत नसल्याने देवीच्या दर्शनासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्वे गावापासून तीन किलोमीटर व कऱ्हाड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर ‘वाघ’ नावाच्या शिवारात सुमारे चारशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेले धानाईदेवी मंदीर आहे. एक-एकर क्षेत्रात मोठ्या घडीव दगडांमध्ये या मुळ मंदिराची उभारणी करण्यात आली होती़ मात्र, कालांतराने या मंदिराची पडझड झाली. त्यामुळे मंदिराचा जिर्णोध्दार करावा, अशी ग्रामस्थांसह भाविकांचीही मागणी होती. त्याबाबत देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापकांनाही ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली. मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी अर्थिक मदत देण्याची तयारीही ग्रामस्थांकडून दर्शविली. वैद्यकीय अधिकारी डॉ़ भगवान थोरात यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला. मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी त्यांनी गावातील युवकांना हाक दिली़ मंदिर जिर्णाेध्दाराबाबत चर्चा करण्यासाठी संबंधित युवकांना त्यांनी मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन केले़ त्यानुसार मोठ्या संख्येने युवक मंदिरामध्ये जमले. पुरातन दुरवस्था झालेले मंदिर उतरवून त्याठिकाणी नवीन मंदिर बांधण्याचा निर्धार त्यावेळी व्यक्त करण्यात आला. श्रमदानातून जुने मंदिर उतरविण्यात आले. तसेच जिर्णाेध्दारासाठी अपेक्षित सुमारे दोन कोटींच्या घरात असलेल्या खर्चाची रक्कम उभी करण्यासाठी ग्रामस्थांनी त्याच्या शेतातील ऊस उत्पादनातून प्रतिटन २५ ते ४० रूपये मंदिराच्या उभारणीसाठी दिले. तसेच संबंध महाराष्ट्रातील भाविकांनीही मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी सढळ हस्ते मदत केली. मंदिर परिसरात निवासस्थानची सोय नाही. त्यामुळे परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. मंदी परीसरात स्वच्छताही ठेवली जात नाही. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदिकरण करणेही गरजेचे आहे. तसेच परिसरात वाहनतळाची व्यवस्था करावी.
उन्हात तसेच पावसात दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शनमार्गात शेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मंदिर परिसरातील वाढलेली झुडपे-गवत काढून बगिचा करण्यात यावा, अशा मागण्या भाविकांकडून होत आहेत़ तसेच मंदिर आवारात सी़ सी़ टी. व्ही. बसविणेही आवश्यक आहे.
ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टबरोबरच प्रशासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कायम सुरक्षा रक्षकाची गरज
मंदीराचा जिर्णाेद्धार झाल्यामुळे येथील रूपडेच पालटल्याचे सध्या दिसून येत आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अद्यापही म्हणाव्या तशा सोयीसुविधा मिळत नाहीत. येथे सेवकांचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारीही उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात येत असलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरुप रक्षक नेमण्याची गरज आहे.