साडेचारशे गाड्या कोरोना फ्री; प्रवाशांमध्ये गरज शिस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:39+5:302021-09-18T04:41:39+5:30
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने कोरोना व्हायरस मारणाऱ्या अँटी मायक्रोबिअल कोटिंग करण्यास ...

साडेचारशे गाड्या कोरोना फ्री; प्रवाशांमध्ये गरज शिस्ती
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने कोरोना व्हायरस मारणाऱ्या अँटी मायक्रोबिअल कोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विभागातून सध्या रस्त्यावर धावत असलेल्या ४७० गाड्यांचे कोटिंग केले आहे. मात्र, प्रवाशांमधून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. अनेकांचे मास्क खाली गळालेले असतात.
कोरोनामुळे एखाद्या संस्थेला किती मोठा आर्थिक फटका बसू शकतो, याचा अनुभव एसटी महामंडळात काम करीत असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. कोरोनाचा विषाणू धातूच्या पृष्ठभागावर जास्त काळ जिवंत राहतो, तसेच गर्दीत एखाद्या व्यक्तीपासून दुसऱ्याला संसर्ग होत असतो. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात फटका बसला. त्यातून लाट कमी झाली तरी संसर्गाच्या भीतीने प्रवासी बाहेर पडत नव्हते. त्यामुळे एसटी गेल्या दीड वर्षांपासून अडचणीचा सामना करीत आहे.
कोरोनाचा फटका आणखी बसू नये म्हणून महामंडळाने प्रत्येक गाड्यांमध्ये प्रवाशांचा सातत्याने स्पर्श होत असलेल्या पृष्ठभागाला अँटी मायक्रोबिअल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्या मार्गदर्शनासाठी सध्या रस्त्यावर धावत असलेल्या ४७० गाड्यांना कोटिंग केले आहे. मात्र, प्रवाशांनी सवयभान राखणे गरजेचे आहे. गर्दीमध्ये अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवासी कोट :
गर्दीच एवढी असते की श्वासही घेता येत नाही
एसटीला सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे गरम व्हायला लागतं. धड श्वासही घेता येत नाही. अशावेळी मास्क घालून किती वेळ थांबू शकतो. त्यामुळे आम्ही नाइलाजाने मास्क काढत असतो.
- संभाजी दुधांडे, प्रवासी
एसटी महामंडळाने कोरोनाचा विषाणू पत्र्यावर जास्त वेळ जगून इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे; पण आता प्रवाशांनीही स्वत:सोबत इतरांची काळजी घेण्याची गरज आहे.
- अभिजित हेरवाडे, प्रवासी
कोट :
महाबळेश्वर आगारात ४२ गाड्या आहेत. त्यातील २८ गाड्यांचे कोटिंग केले आहे. त्यामुळे एसटीमुळे प्रवाशांना कोरोना होण्याचा धोका पूर्णपणे संपला आहे. आता प्रवाशांनीच सजगपणे काळजी घेण्याची गरज आहे.
- नामदेव पतंगे,
आगार व्यवस्थापक, महाबळेश्वर
चौकट
तीन महिन्यांनी करावी लागणार कोटिंग
सातारा विभागातील पन्नास टक्क्यांहून अधिक गाड्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अँटी व्हायरसचा डोस दिला आहे. अँटी मायक्रोबिअल कोटिंगची काही महिने परिणामकारकता राहते. त्यामुळे साधारणत: दर तीन महिन्यांनंतर कोटिंग करावे लागणार आहे. यासाठी खासगी कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
चौकट :
एसटी निरोगी, पण सह प्रवाशांचं काय
कोरोनाचा संसर्ग पृष्ठभागावरील कोरोना विषाणूमुळे पसरतो, हे गृहीत धरून एसटीला कोटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे एखादा कोरोनाबाधित व्यक्ती उतरल्यानंतर तेथे निरोगी व्यक्ती बसल्यामुळे कोरोना होण्याची शक्यता संपली आहे; पण आपल्यासोबतच कोरोनाबाधित व्यक्ती शेजारी येऊन बसला तर काय करायचं, हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रवाशांनीही स्वत: काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी सातत्याने मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.