अडीच तोळ्यांचे सापडलेले गंठण केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:42+5:302021-04-02T04:40:42+5:30
चाफळ : खासगी प्रवासी गाडीत एका महिलेचे गहाळ झालेले अडीच तोळ्यांचे गंठण सापडल्यानंतर ते प्रामाणिपणे महिलेस परत करणाऱ्या ...

अडीच तोळ्यांचे सापडलेले गंठण केले परत
चाफळ :
खासगी प्रवासी गाडीत एका महिलेचे गहाळ झालेले अडीच तोळ्यांचे गंठण सापडल्यानंतर ते प्रामाणिपणे महिलेस परत करणाऱ्या चाफळ येथील अनिल साळुंखे व धोंडिराम हिंदोळे या दोघांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी ११ वाजता माया संजय पवार (रा. काशीळ व शिल्पा वास्के रा. केसे पाडळी) या दोन बहिणी वाघजाईवाडी येथे राहत असलेल्या भावाकडे यात्रेसाठी आल्या होत्या. यात्रा झाल्यानंतर त्या आपल्या गावी जाण्यासाठी चाफळ येथील एसटी बसस्थानकात आल्या होत्या. बराच वेळ थांबूनही एसटी बस नसल्याचे पाहून व जवळ असलेले बाळ रडत असल्याने त्यांनी चाफळ येथील अनिल साळुंखे यांच्या खासगी वाहनातून उंब्रजपर्यंत प्रवास केला. यादरम्यान त्यांचे सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठण गाडीच्या मागील सीटवर पडले होते. साळुंखे यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी ही प्रथम बाब चाफळ येथील पोलीस दूरक्षेत्राचे सुशांत शिंदे यांना सांगितली. शिंदे व साळुंखे यांनी चाफळ बाजारपेठेतील धोंडिराम हिंदोळे यांच्या मदतीने मोबाइलवरून सर्व ग्रुपवर संपर्क साधत मेसेज करून ओळख पटवून गंठण घेऊन जाण्याचे आवाहन केले. दोन तासांनंतर महिला आपल्या घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या गळ्यातील गंठण पडले आहे. त्यानंतर या बहिणींनी वाघजाईवाडी येथील भावास फोन करून गंठण पडल्याचे सांगितले. यावेळी भावाने चाफळ येथे येऊन विचारपूस करण्यास सुरुवात असता हे गंठण चाफळ येथील अनिल साळुंखे यांना सापडले असल्याचे समजले असता त्यांनी त्यांची समक्ष गाठ घेऊन आपल्या बहिणीचे गंठण असल्याचे अनिल साळुंखे यांना सांगितले व ओळख पटल्यानंतर हे गंठण त्या महिलेस धोंडिराम हिंदोळे, विकास हिंदोळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.