चाळीस वर्षांपूर्वीच्या आगीची कोरेगावकरांना आठवण

By Admin | Updated: February 7, 2015 00:12 IST2015-02-06T22:47:52+5:302015-02-07T00:12:03+5:30

शॉर्टसर्किट : रहिमतपूर रस्त्यावर वाहतूक बंद

Forty years ago the fire was remembered by Koregaonkar | चाळीस वर्षांपूर्वीच्या आगीची कोरेगावकरांना आठवण

चाळीस वर्षांपूर्वीच्या आगीची कोरेगावकरांना आठवण

कोरेगाव : रहिमतपूर रस्त्यावर बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर असलेल्या प्रदीप डोंबे यांच्या डोंबे हँडलूम अँड फर्निचर या दुकानाला शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास विद्युत पुरवठ्याचा दाब अचानक वाढून शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत सुमारे सहा ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जरंडेश्वर शुगर मिल्स, किसन वीर कारखाना आणि सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे वृत्त समजताच शहरात खळबळ उडाली. रहिमतपूर रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली होती.
डोंबे यांनी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडले होते. दुपारच्या सुमारास विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यानंतर काही वेळेतच तो सुरळीत झाला; मात्र विद्युतपुरवठा अचानक वाढल्याने शॉर्टसर्किट झाले आणि दुकानाला आग लागली. दुकानाच्या पाठीमागे असलेल्या गादी कारखान्यातील कापूस आणि कापड पेटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातील लाकडी फर्निचरने पेट घेतला आणि क्षणातच दुकान बेचिराख झाले. दुकानातून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट येत असल्याचे पाहून परिसरातील दुकानदार आणि रहिवाशांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. अर्ध्या तासातच सातारा नगरपालिकेसह किसन वीर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग पूर्णत: आटोक्यात आणली. आगीचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर गायकवाड, नायब तहसीलदार (महसूल) रवींद्र रांजणे, श्रीरंग मदने, पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, महावितरणचे शाखा अभियंता प्रशांत वाघ, तलाठी भास्करराव निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि महावितरणचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युतपुरवठा बंद ठेवल्याने पुढील अनर्थ टळले.
याप्रकरणी प्रदीप डोंबे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हवालदार बी. आर. यादव तपास करत आहेत. (प्रतिनिधी)


१९७५ सालच्या आगीची आठवण
डोंबे कुटुंबीयांचे मेनरोडवर जैन मंदिरासमोर लोखंड व पत्रा दुकान होते. त्या दुकानाला १९७५ मध्ये रात्रीच्या सुमारास आग लागली होती. त्याची झळ शेजारच्या काही दुकानांना बसली होती. या डोंबे कुटुंबीयांतील प्रदीप डोंबे यांच्या दुकानाला आज (शुक्रवारी) आग लागल्याने जुन्या आगीच्या घटनेची चर्चा घटनास्थळी होती.

Web Title: Forty years ago the fire was remembered by Koregaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.