माजी पोलीस पाटलाच्या मुलाला पोलिसाकडून रस्त्यावर मारहाण
By Admin | Updated: November 6, 2014 22:58 IST2014-11-06T21:50:27+5:302014-11-06T22:58:24+5:30
नातेवाइकांचा आरोप : जखमी मुलावर रुग्णालयात उपचार

माजी पोलीस पाटलाच्या मुलाला पोलिसाकडून रस्त्यावर मारहाण
कऱ्हाड : हिंगनोळे येथील माजी पोलीस पाटील पोपट थोरात यांचा मुलगा देवदत्त याला उंब्रज पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने बेदम मारहाण केल्याचा आरोप कऱ्हाडात पत्रकार परिषदेत केला.
पोपट थोरात यांनी दिलेली माहिती अशी की, त्यांचा मुलगा देवदत्त हा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून चोरे रस्त्यावरून निघाला असताना पोलीस कॉन्स्टेबल मारेकरी याने त्याला अडविले. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्याने देवदत्तला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवदत्तचे चुलतभाऊ महेंद्र त्याठिकाणी आले. त्यांनी देवदत्तला करीत असलेल्या मारहाणीबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला विचारणा केली. तसेच ‘तुम्ही कायदेशीर कारवाई करा, देवदत्तला मारहाण करू नका,’ अशी विनंती केली. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने महेंद्र यांनाच शिवीगाळ केली.
‘त्याठिकाणी आलेल्या मुकुंद गोळे यांच्याशीही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन केले. त्यामुळे मुकुंद गोळे यांनी याबाबत देवदत्तचे वडील पोपट थोरात यांना फोनवरून माहिती दिली. गोळे यांनी पोपट थोरात यांना फोन केला असतानाही संबंधित कर्मचाऱ्याकडून देवदत्तला मारहाण सुरूच होती. मारहाण केल्यानंतर पोलीस कर्मचारी देवदत्तला घेऊन पोलीस ठाण्यात गेला. त्याठिकाणी देवदत्तच्या हातातील सुमारे ५५ हजारांची अंगठी व १ हजार ६०० रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. पोलीस ठाण्यातील एका खोलीत नेऊन पुन्हा देवदत्तला लाथाबुक्क्या व पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे देवदत्त बेशुद्ध पडला. काही वेळानंतर सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी देवदत्तला शासकीय गाडीमधून उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्याठिकाणी डॉ. नाथ यांनी तपासणी करून त्याला पुढील उपचारार्थ कऱ्हाडला नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढील उपचारासाठी देवदत्तला कऱ्हाडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. देवदत्तवर उपचार सुरू आहेत. खुनीहल्ला करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल मारेकरी याला बडतर्फ करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही थोरात यांनी केली आहे. याबाबत अर्ज मुख्यमंत्री, विभागीय पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना दिला आहे. (प्रतिनिधी)
हा आरोप पूर्णपणे खोटा असून कोणालाही मारहाण झालेली नाही. पोपट थोरातांनी पोलीस खात्यावर केलेल्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईलच.
- मारुती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक