‘प्रतापगड’च्या संचालकांना मदतीचा विसर : चंद्रसेन शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:46+5:302021-02-07T04:35:46+5:30

भुईज : प्रतापगड कारखाना चालविण्यास घेण्यात व्यक्तिगत स्वार्थ किंवा धंदेवाईक उद्देश नाही. शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्थेचा गळा घोटून ती संस्था ...

Forget to help the director of 'Pratapgad': Chandrasen Shinde | ‘प्रतापगड’च्या संचालकांना मदतीचा विसर : चंद्रसेन शिंदे

‘प्रतापगड’च्या संचालकांना मदतीचा विसर : चंद्रसेन शिंदे

भुईज : प्रतापगड कारखाना चालविण्यास घेण्यात व्यक्तिगत स्वार्थ किंवा धंदेवाईक उद्देश नाही. शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्थेचा गळा घोटून ती संस्था कोणीतरी स्वतःच्या मांडीखाली दाबण्याचा प्रयत्न करत होते म्हणून तो निर्णय घेण्यात आला. आपुलकी, मदतीच्या भावनेचा विसर पडून ‘प्रतापगड’च्या संचालकांनी उभे केलेले चित्र धूळफेक करणारे आहे, असे मत किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे यांनी व्यक्त केले.

चंद्रसेन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुळातच किसनवीर कारखाना कारभार करताना एफआरपीपेक्षा काही कोटींची जादा रक्कम देण्याचा विक्रम करीत होता. त्याचवेळी कार्यक्षेत्रातीलच शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना लिलावात निघतोय म्हटल्यावर तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या सूचनेनुसार प्रतापगडच्या व्यवस्थापनाने प्रतापगड सोळा वर्षांच्या कराराने किसनवीरकडे सोपवला. तेव्हा हा कारखाना खासगीकरणात बळकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रतापगडच्या व्यवस्थापणाने कारस्थानाला बळी न पडता कारखाना सहकारात टिकवला. त्यावेळी तातडीने गळीत हंगाम सुरूही केला आणि यशस्वीही केला. सलग पाच वर्षे हंगाम यशस्वी करताना एक गळीत हंगाम घेता आला नाही. मात्र पुढील वर्षी पुन्हा कारखाना सुरू केला. गेल्या हंगामात अडचणी आल्या असल्या तरी यंदा कारखाना सुरू करण्याची तयारी झाली होती. बॉयलर प्रदीपनही झाले, मात्र यांच्याच असहकार्यामुळे मोळी पडली नाही, त्यामुळे सलग तीन वर्षे कारखाना बंद होता हे विधान खोटे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. कराराप्रमाणे प्रतापगडची ५१.४० कोटी रुपयांची देणी होती. त्यातील ४९.२४ कोटींची देणी किसनवीरने दिली आहे. सहकारात आता साखर कारखाना उभे राहणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे आहे ते टिकावे यासाठी विस्तवाची वाट चालण्याची तयारी ठेवली, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी, काही गोष्टी बोलत नाही याचा गैर अर्थ काढू नये, बोलण्यास भाग पाडू नये, असेही चंद्रसेन शिंदे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Forget to help the director of 'Pratapgad': Chandrasen Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.